Breaking News

निकषाच्या बाहेर जाऊन नुकसानग्रस्तांना मदत करा : आमदार रवींद्र चव्हाण

रोहे : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक वर्षे जतन केलेल्या आंबा, नारळ, सुपारीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. कोकणातील ही शेती हंगामी स्वरुपाची नसून शाश्वत असल्याने या झाडांच्या उत्पादनाच्या सर्वंगीण स्त्रोत्राचा अभ्यास करून यापूर्वी दिल्या गेलेल्या भरपाईच्या निकषाच्या बाहेर जाऊन राज्य सरकारने बागायतदार शेतकर्‍यांना मदत करण्याची गरज असल्याची आग्रही मागणी रायगडचे माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण केली. रोहा शासकीय विश्रामगृहात सोमवारी (दि. 9) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याचा आमदार रवींद्र चव्हाण यांनी दौरा केला. रोहा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचीही त्यांनी पाहणी केली. भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, दक्षिण जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सरचिटणीस मिलिंद पाटील, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग, ज्येष्ठ नेते संजय कोनकर, तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, शहर अध्यक्ष शैलेश रावकर, सनीलकुमार आदी भाजप नेते, पदाधिकारी समवेत होते.
आमदार चव्हाण म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील बागा पुन्हा उभ्या करायच्या असतील, तर त्याला किमान सात वर्षे लागतील. या कालावधीत त्यांच्या आंबा, नारळ, सुपारी या रोपांची व्यवस्था करणे आवश्यक आहे. खत, पाण्याचे नियोजन करणेही गरजेचे आहे. या सर्व बाबींचा राज्य सरकारने सकारात्मक विचार करून कृती आराखडा तयार करावा व कोकणातील शेतकर्‍यांना दिलासा द्यावा.
भाजपचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाहाणी दौरा व नुकसानग्रस्त भागात मदत करण्यासाठी आम्ही आलो आहोत. अत्यंत अवश्यक असलेल्या ठिकाणी भाजपच्या वतीने पत्रे व सौरऊर्जेवरील कंदील देण्यात येणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.
राज्य सरकारने नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर करावा – आमदार प्रशांत ठाकूर
राज्य सरकारने रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत म्हणून 100 कोटी रुपये जाहीर केले. त्याचप्रमाणे याद्या तयार करण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रमावस्था आहे. प्रत्यक्ष मदत किती मिळणार, हे नागरिकांना कळत नाही. ते पाहता राज्य सरकारने लोकांच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशी मागणी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केली.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply