अलिबाग : प्रतिनिधी
डस्टर कारमधून विक्रीसाठी चोराटी दारू आणणार्या दोघाजणांना उत्पादन शुल्क विभागाच्या अलिबाग येथील अधिकार्यांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडले आहे. मॅक्डोल आणि डीएसपी मद्याच्या बॉटल आणि कार असा लाखोंचा माल उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.
अलिबाग उत्पादन शुल्क विभागाला दिव दमन येथील दारू घेऊन काहीजण अलिबागेत येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कार्लेखिंड येथे उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचला होता. माहिती दिलेली डस्टर कार कार्लेखिंड येथे आली असता उत्पादन शुल्क अधिकार्यांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने कार न थांबविता भरधाव वेगाने अलिबागकडे पळाला. उत्पादन शुल्क अधिकार्यांनीही फिल्मी स्टाईल कारचा पाठलाग करून पिंपळभाट येथे कारसह दोघांना ताब्यात घेतले.
उत्पादन अधिकार्यांनी जप्त केलेली कार आणि दोघे आरोपी यांना अलिबाग येथे कार्यालयात आणले. कारची तपासणी केली असता कारमध्ये मॅक्डोल आणि डीसीपी दारूच्या बाटल्याचे 10 बॉक्स आणि खंबे असल्याचे दिसले. याबाबत दोघांकडे चौकशी केली असता, ही कार पनवेल येथील असून, दारू दिव दमन येथील असल्याचे कबूल केले. ही दारु कोणासाठी आणली आहे, याबाबतचा तपास अधिकारी करीत आहेत. दारू आणि कार जप्त केली असून दोघांना ताब्यात घेतले आहे. उत्पादन शुल्क निरीक्षक ए. आर. पिंपळवार, उपनिरीक्षक एस. एस. कदम, हेड कॉन्स्टेबल गायकवाड, जमादार हाके, कॉन्स्टेबल कल्याणी ठाकूर, राजेश भगत यांनी ही कारवाई केली आहे.