Breaking News

राज्य सरकारने कोकणवासीयांची थट्टा करू नये!

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा इशारा

माणगाव : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांची घरे उद्ध्वस्त होऊन बागायतदारांचीही जबर हानी झाली आहे. त्यांना उभारी देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. कोकणवासीयांचे उपकार सरकारवर आहेत. त्यामुळे कोकणवासीयांना या संकटमय परिस्थितीत सरकारने भरीव मदत करावी. त्यांची थट्टा करू नये. अन्यथा भारतीय जनता पक्ष टोकाची भूमिका घेईल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी (दि. 9) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
रायगड जिल्ह्याला 3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा केला. माणगाव येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, अनेक बागायतदारांच्या आंबा, नारळ, सुपारीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असून, अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा, रोहा, तळा, मुरूड, पेण, पोलादपूर तालुके; तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व मंडणगड तालुक्यातील बर्‍याच गावांची वाताहत झाली आहेत. बागायतदारांचे जवळपास 18 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
माझा दौरा सुरुवातीला झाल्यानंतर मुख्यमंत्री रायगडात आले व त्यांनी रायगड जिल्ह्यासाठी तुटपुंजी मदत जाहीर केली. एसडीआरएफ व एनडीआरएफ संकटकाळात मदत देत असतात, मात्र राज्य सरकारने कोकणवासीयांना भरीव आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. 33 टक्के ते 50 टक्के पडझड झालेल्या घरांना एक लाख रुपये, तर पूर्ण पडलेल्या घरांना तीन लाख रुपये मदत सरकारने द्यावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नुकसान झालेल्या बागायतदारांच्या आंबा व नारळ यांच्यासाठी खुंटी कलम करण्याचीही मागणी त्यांनी केली.
कोरोना काळात भाजपने प्रचंड सेवाभावी कार्य केले. आता कोकणावर उद्भवलेल्या नैसर्गिक संकटातही भाजप नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी भक्कमपणे उभा राहिला आहे. एकही घर पत्र्याशिवाय राहणार नाही. भाजपकडून 16 ट्रक पत्र घेऊन निघाले असून, जिल्हावासीयांची विजेची समस्या पाहता सौरदिवे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोकणात बागायतदारांबरोबरच मजुरांचीही अवस्था बिकट झाली आहे. कोकणाने संकट काळात इतर जिल्ह्यांना वेळोवेळी मदत केली असून, आता तेथील जनतेनेे कोकणवासीयांना या संकटमय परिस्थितीत मदत करावी, असे आवाहन या वेळी विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केले.
पत्रकार परिषदेला आमदार पराग आळवणी, भाजप प्रवक्ते माधव भंडारी, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मोपारा, भालचंद्र महाले, योगेश सुळे, सुरेंद्र साळी, चिन्मय मोने, राजू मुंढे, गोविंद कासार, बाबूराव चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply