वाराणसी : वृत्तसंस्था
आतापर्यंत आपण क्रिकेटचे सामने हे शर्ट-पँट अशा गणवेशात पाहिलेले आहेत, मात्र वाराणसीमध्ये वैदिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी चक्क धोतर आणि कुर्त्यात क्रिकेटचा सामना खेळला. संपुर्णानंद संस्कृत विद्यालयाने आपल्या 75व्या वर्धापन दिनानिमित्ताने या सामन्याचे आयोजन केले होते. या वेळी अनोखी वेशभूषा परिधान करून खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवून दिले. इतकेच नव्हे; तर या सामन्यातले पंचही पारंपरिक वेषात मैदानात उतरले होते. या सामन्याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या सामन्याचे समालोचन हे संस्कृतमध्ये करण्यात आले. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनाही हे आगळेवेगळे दृश्य पाहून सुखद धक्का बसला. वैदिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये खेळाप्रती आवड निर्माण व्हावी यासाठी या सामन्याचे आयोजन करण्यात आल्याचे, शाळेचे शिक्षक गणेशदत्त शास्त्री यांनी सांगितलं. 10 षटकांच्या या सामन्यात वाराणसीच्या परिसरातील सर्व संस्कृत शाळांनी सहभाग घेतला होता. श्रेष्ठनारायण मिश्रा आणि डॉ. विकास दीक्षित यांनी या सामन्यात संस्कृतमधून समालोचन केले.