मुरूड ः प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तांचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने मुरूडला भेट देत येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
पथकाने मुरूड तालुक्यातील बोर्ली, काशिद, नांदगाव, आगरदांडा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीची आणि झालेल्या नुकसानीची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केंद्र शासनाच्या आंतर मंत्रालयीन पथकातील सदस्य सहसचिव (प्रशासन व सीबीटी), एनडीएमच, एमएचए, नवी दिल्ली रमेशकुमार गंटा (भाप्रसे), सल्लागार अर्थ मंत्रालय (खर्च), नवी दिल्ली आर. बी. कौल, संचालक, ऊर्जा मंत्रालय, सीईए, नवी दिल्ली एलआरएल. के. प्रसाद, उपसचिव, ग्रामीण विकास, नवी दिल्ली एस. एस. मोदी, संचालक, कृषी मंत्रालय, नागपूर आर.पी. सिंग, कार्यकारी अभियंता, क्षेत्रीय कार्यालय, रस्ते वाहतूक व महामार्ग, मुंबई, तुषार व्यास यांना नुकसानाबाबतची माहिती दिली.
या वेळी केंद्रीय पथकातील सदस्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना सूचना केल्या की, चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबतची संख्यात्मक माहिती देताना छोट्या छोट्या गोष्टींचीही बारकाईने नोंद घेण्यात यावी. कृषी विभाग, मत्स्य विभाग, महसूल विभाग, महावितरण या संबंधित सर्व विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकार्यांनी जनतेच्या झालेल्या नुकसानीची बारकाईने नोंद घेऊन त्याप्रमाणे अहवाल तयार करावा. या अहवालाचा अभ्यास करून हे पथक पुन्हा एकदा जिल्ह्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.