
अलिबाग ः प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे मागील तीन महिने ऑफ केलेले सहा आसनी प्रवासी रिक्षांचे स्विच अलिबागेत सोमवारपासून ऑन झाले आहेत. आता रिक्षाचालकांना प्रतीक्षा आहे ती प्रवाशांची. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मेपासून टाळेबंदी लागली. या टाळेबंदीमध्ये प्रवासी वाहनांचेही स्विच ऑफ झाले. साठवलेल्या जमापुंजीवर काही दिवस गेले, मात्र त्यानंतर रिक्षाचालकांची परवड सुरू झाली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता टाळेबंदीही वाढत गेली. सामाजिक जाणिवेतून मदतीचे हात पुढे आले, पण किती दिवस? रिक्षाचे हप्ते भरायला सध्या मुदतवाढ मिळेलही, पण पुढे जाऊन हप्ते भरावेच लागणार या विवंचनेत रिक्षाचालकांनी गेली तीन महिने काढले. घर खर्च कसा करायचा, इतर आवश्यक खरेदीसाठी पैसा कुठून आणायचा, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले. अखेर पाचव्या टाळेबंदीमध्ये मिळालेल्या शिथिलतेमध्ये प्रवासी रिक्षांनाही काही अटी-शर्थींवर परवानगी मिळाली आणि गेली तीन महिने सुने पडलेल्या अलिबागेतील सहा आसनी रिक्षा स्टॅण्डमध्ये थोड्या प्रमाणात रिक्षा दिसू लागल्या. सोमवारपासून अलिबागच्या रस्त्यावर प्रवासी रिक्षा धावू लागल्या आहेत. त्याआधी शहरातील तीन आसनी रिक्षा प्रवाशांसाठी सेवेत उभ्या होत्या. आता सहा आसनी रिक्षा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. तीन महिने बंद असलेले स्विच आता ऑन झाले आहेत. अलिबागेत येण्या- जाण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे. रिक्षाचालकांनाही आता प्रवाशांची प्रतीक्षा आहे, पण सर्वांनी नियम पाळणेही अत्यावश्यक आहे.