मोहोपाडा : प्रतिनिधी
कोरोना या विषाणूने सर्वत्र हाहाकार माजला असून दोन महिने रसायनीकरांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पाळन केल्यानंतर रसायनीत कोरोनाने पुन्हा शिरकाव करुन परीसरात भिती निर्माण केली आहे. रसायनीत याअगोदर एकूण बारा कोरोनाबाधित सापडले असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. यानंतर दोन आठवड्यानंतर रसायनीत पुन्हा कोरोनाने शिरकाव केला असून रिसवाडी येथील एक कोरोना रुग्ण पॉजिटीव्ह आला असून त्यांच्या कुटुंबीयांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर कांबे गावातही एक कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण सापडला असल्याने वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत नव्याने दोन रुग्ण सापडले आहेत. तर कामोठ्याहून रसायनीत एचआयएल कंपनीत कामानिमित्त येणार्या कामगारालाही कोरोना झाल्याने कंपनीने खबरदारी घेत परीसर निर्जंतुकीकरण केला. तसेच आपत्तकालीन सेवा वगलता रविवार (दि.21)पर्यंत कामकाज बंद राहणार आहे.
रसायनी परीसरातील पुन्हा कोरोनाने शिरकाव केल्याने नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन आपल्या स्व:ताची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन होत आहे.