Breaking News

कोरोना रुग्णाचा खासगी गाडीतून प्रवास; ग्रामपंचायतीने वेधले रिलायन्सचे लक्ष

नागोठणेः प्रतिनिधी

रुग्णाच्या आजारपणाची पूर्वकल्पना न देता तसेच चालकाला कोणत्याही प्रकारची सुरक्षा प्रदान न करता नागोठण्यातील एका टुरिस्ट कारचालकाला रुग्णालयात पाठविल्याबद्दल नागोठणे ग्रामपंचायतीने खंत व्यक्त करीत नागोठणे गावाला उद्भवणार्‍या धोक्याबाबत निवेदनाद्वारे नागोठणे रिलायन्सच्या अध्यक्षांचे लक्ष वेधले आहे.

येथील रिलायन्स निवासी संकुलात राहणार्‍या कंपनीच्या एका कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाली असून सध्या तो नवी मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत आहे. 14 जूनला कंपनीत भाडेतत्त्वावर चालणार्‍या टुरिस्ट कारच्या नागोठण्यातील सुदर्शन कोटकर या चालकाना कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने निवासी संकुलात राहणार्‍या एका व्यक्तीला नवी मुंबईत जायचे आहे, असे सांगून या चालकाला संबंधित व्यक्तीचा इमारतीचा टाइप व घर नंबर दिला होता. कोटकर यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा न देता ते संबंधित व्यक्ती तसेच नातेवाइकाला घेऊन नवी मुंबईतील एका रुग्णालयात गेले होते. याबाबत कोटकर यांना विचारले असता तोपर्यंत मला पुसटशीही कल्पना नव्हती. हा रुग्ण तेथे दाखल झाल्यानंतर काही काळातच त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले होते. नागोठणेत याचा बभ्रा झाल्यावर खबरदारी म्हणून नागोठणे ग्रामपंचायतीकडून या चालकाला तसेच त्याच्या पत्नीला होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

याबाबत रिलायन्सचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांना या रुग्णाला कंपनीच्या रुग्णवाहिकेतून न नेता कारमधून कसे काय नेले असे विचारले असता या रुग्णाला तपासणीसाठीच रुग्णालयात न्यायचे असल्याने त्यांना कारमधून पाठवले होते व तेथे गेल्यानंतरच त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळाल्यावर तातडीने कोटकर व त्यांच्या पत्नीची कंपनीच्या रुग्णालयात सर्व तपासणी केली असून दोघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत कोटकर यांना विचारले असता त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंतची संपूर्ण माहिती कथन करताना मला या प्रकरणात अंधारात ठेवून माझी फसवणूकच झाल्याचे स्पष्ट केले. याबाबत कंपनीच्या अधिकार्‍याकडे नाराजी व्यक्त केली असता काम करायचे नसेल तर नोकरी सोड, असा मोलाचा सल्ला दिला होता, असे कोटकर यांनी सांगितले. एका कोरोना रुग्णाला माझ्या गाडीतून घेऊन गेल्यामुळे मला क्वारंटाईन केल्याने माझ्याबाबत नागोठणेत उलटसुलट चर्चा केली जात असून त्यामुळे माझे मानसिक स्वास्थ्य हरपले आहे. माझी आई तसेच इतर नातेवाईक मासळी विक्रीचा व्यवसाय करतात. माझ्याबाबत शहरासह विभागात नको तो गोंगाट झाल्याने व्यवसायावरही गदा आल्याचे कोटकर यांनी सांगितले. याबाबत सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी रिलायन्सचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदनाद्वारे लक्ष वेधून खंत व्यक्त केली आहे. हे कृत्य बेजबाबदारपणाचे तसेच कोरोना हा जागतिक साथीचा रोग घोषित केला असतानाही साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 2005 कोविड 19 नियम 2020चा भंग करून सुदर्शन कोटकर आणि त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवाराचे आरोग्य धोक्यात आणल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. संबंधित निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकार्‍यांनाही पाठविण्यात आली आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply