कर्जत ः बातमीदार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत-खालापूर तालुक्यातील 407वे रक्तदान शिबिर राणाप्रताप मित्र मंडळ मोठे वेणगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास 47 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
तालुक्यातील मोठे वेणगाव येथील राणाप्रताप मित्र मंडळ यांच्या वतीने विठ्ठल मंदिराच्या सभागृहात समर्पण ब्लड बँक घाटकोपर, मुंबई यांच्या सहकार्याने स्वर्गीय प्रितेश शिंदे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन सरपंच अभिषेक गायकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच गणेश पालकर, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन शेलार, ग्रामपंचायत सदस्य सुनील आंग्रे, सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी, जितेश आंब्रे, प्रशांत आंग्रे, नितीन गवसकर आदी उपस्थित होते. सर्वप्रथम उद्योजक गणेश मुंढे यांनी रक्तदान करून रक्तदानाचा शुभारंभ केला. ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे यांनी 63व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल आपले 63वे रक्तदान केले. जितेश आंब्रे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान केले. रक्तसंकलनाचे काम घाटकोपर येथील समर्पण रक्तपेढीच्या डॉ. अर्चना पेडणेकर, पूनम यादव, लता देशक, लक्ष्मण नाईक, कुणाल शेडेकर, साहिल साठे, प्रदीप लोंढे, एकनाथ नरसाळे यांनी केले.