वाहतूक बंद; ग्रामस्थांचा फेरा वाढला
कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील कशेळे-पिंपळोली-तळवडे-नेरळ या जिल्हा मार्ग रस्त्यावरील अंथ्राट-गुडवण आणि तेथून बोरिवलीकडे जाणार्या रस्त्यावर भगदाड पडले आहे, तर नेरळ-गुडवण रस्ता मध्यभागापासून खचला असून या मार्गावरील मोठ्या वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांना लांबचा फेरा मारत कशेळे-मुरबाड रस्ता किंवा कशेळे-नेरळ या राज्यमार्गांवर यावे लागत आहे.
पाच दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील अनेक तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. काही ठिकाणी साकव वाहून गेले आहेत तर काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. त्यात मोठ्या रहदारीचा नेरळ-पिंपळोली-गुडवण-सुगवे हा रस्ता अंथ्राट भागात खचला आहे. डायरेंची अंथ्राट येथून गुडवण या रस्त्यावर चिल्लार नदीच्या बाजूचा रस्ता किमान 10 मीटर एवढा मुख्य रस्त्यात आणि खाली आणखी मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचा माती भराव वाहून गेला आहे. त्यामुळे कोणतेही चारचाकी वाहन रस्त्यावरून येणे जाणे बंद झाले आहे. परिणाम अंथ्राट गावातील ग्रामस्थांना गुडवण गावावरून कशेळे भागात वाहने घेऊन जाता येत नाही. कशेळे भागात जायचे असेल तर तळवडे पुलावरून नेरळ येथे येऊन जावे लागत आहे. हा किमान 10 किलोमीटरहून अधिकचा वळसा आहे. त्याच वेळी गुडवणपासून बोरिवलीकडे जाणार्या डांबरी रस्त्यावरच रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडले आहे.त्यामुळे गुडवण भागातील रहिवाशांना बोरिवली गावावरून कशेळे येथे जाण्यासाठी असलेला रस्तादेखील बंद झाला आहे. त्यामुळे सुगवे येथून कशेळे येथे दैनंदिन बाजारहाट करण्यासाठी जावे लागत आहे.
नेरळ-पिंपळोली-गुडवण-सुगवे या महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक काही दिवस बंद असूनदेखील रस्त्याची अवस्था पाहायला कोणी पोहचले नाही.स्थानिक ग्रामस्थ रवींद्र डायरे यांनी आपली व्यथा सोशल मीडियावर मांडली असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग रस्त्याच्या मालकीबद्दल टोलवाटोलवी करीत असल्याचा आरोप केला आहे. ग्रामस्थांना रस्त्याची गरज असताना देखील प्रशासन या पुलाकडे दुर्लक्ष करीत असल्याने अंथ्राट, पिंपळोली, तळवडे, कालेवाडी, गुडवण, गुडवण वाडी येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. हा रस्ता पहिल्यांदा 15 वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधून घेतला होता, मात्र नंतर या रस्त्यावर ग्रामसडक योजनेचा निधी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून खर्च झाला आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ हे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे डोळे लावून बसले आहेत.
आम्ही दोन्ही बांधकाम खात्याकडे चौकशी केली असता आमच्यासारख्या सामान्य माणसांना कोणी थारा देत नाही. त्यामुळे आपण सोशल मीडियावर आमच्या रस्त्याची स्थिती दाखवली असली, तरी प्रशासन अद्याप आमच्याकडे पोहचले नाही.
-रवींद्र डायरे, ग्रामस्थ
या रस्त्याची माहिती आमच्या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडून तहसील कार्यालयाला प्राप्त झाली आहे, मात्र आपल्या कार्यालयाकडून संबंधित विभागाला सूचित करून रस्त्याची सुधारणा करून रस्त्यावरून वाहतूक सुरू होण्यासाठी प्रयत्न केले जातील.
-विक्रम देशमुख, तहसीलदार, कर्जत