Breaking News

राज्य सरकार शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाही

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांची नाराजी

अलिबाग ः प्रतिनिधी
राज्य सरकार आमचे नाही, तर आघाडीचे आहे. या सरकारचा जिल्हा प्रशासनावर धाक नाही. सनदशीर मार्गाने आंदोलन करूनही राज्य सरकार शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार सुरेश लाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खालापूर तालुक्यातील नंदनपाडा परिसरात जमीन खरेदीसाठी न्यू मिलेनियम कंपनीला दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी सुरेश लाड यांनी रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. लाड यांनी सोमवारी (दि. 20) जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवदेन दिले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे सोबत होतेे.
खालापूर तालुक्यातील नंदनपाडा, गोहे, गोठीवली या गावांत औद्योगिक वसाहतीसाठी घेतलेली जमीन न्यू मिलेनियम कंपनी विकत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचे  नातेवाईक, रायगड जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याच्या बाहेरील दोन विधान परिषद सदस्यांचे नातेवाईक या जमीन विक्री व्यवहारात आहेत. अधिकार्‍यांच्या सगंगनमताने हे व्यवहार सुरू आहेत, असा खळबळजनक आरोप सुरेश लाड यांनी या वेळी केला.
नंदनपाडा, गोहे, गोठीवलीत औद्योगिक प्रकल्पांसाठी जमीन खरेदी करण्यासाठी न्यू मिलेनियम कंपनीला 63-1-अ अन्वये परवानगी देण्यात आली होती. या अंतर्गत शेतकर्‍यांची साडेतीनशे एकर जमीन कंपनीने साठेकराराने अथवा अधिकारपत्राद्वारे खरेदी करण्यात आली होती. गेली दहा वर्ष त्यांनी त्या जागेचा वापर औद्योगिकरणासाठी केला नाही. आता त्यांनी मंदीचे कारण सांगून या जागा औद्योगिकरणासाठी न देता इतर कारणांसाठी विकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ही बेकायदा सुरू असलेली जमीन विक्री थांबवावी. कंपनीला दिलेली जमीन खरेदीची परवानगी शासनाने रद्द करावी. शेतकर्‍यांच्या जागा त्यांना परत द्याव्यात अशी मागणी आम्ही केली आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे लाड यांनी सांगितले.
जमीन खरेदीची परवानगी देताना शासनाने कंपनीला जी नजराणा रक्कम भरायला सांगितली होती ती रक्कम कंपनीने भरलेली नाही. त्यासाठी कंपनीकडून देण्यात आलेले धनादेश वटलेले नाहीत. त्यामुळे नजराणा न भरताच ही जमीन विक्री करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
गेले वर्षभर पाठपुरावा करूनही शासनाने याबाबत कुठलीच दखल घेतलेली नाही. कंपनीला जमीन खरेदी आणि विक्रीसाठी दिलेली परवानगी रद्द करावी, अशी आमची मागणी आहे. तेच आदशे दिले नाहीत, तर 23 डिसेंबरला शेतकर्‍यांसह आपण आत्मदहन करूम असा इशाराही लाड यांनी दिला आहे.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply