कर्जत ़: बातमीदार
कोरोना पार्श्वभूमीवर आघाडीवर राहून काम करणारे वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिक यांना कोविशिल्ड लस देण्यास नेरळमध्ये सोमवार (दि. 8)पासून सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिक आणि जिल्हा परिषद सदस्या अनसूया पादिर यांना पहिली कोविशिल्ड लस देण्यात आली. पहिल्या दिवशी 23जणांना लस देण्यात आली. या आरोग्य केंद्रात आठवड्यातून तीन दिवस लसीकरण केले जाणार आहे.
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारपासून कोविशिल्ड लसीकरण केंद्र सुरू झाले. कर्जत तालुक्यातील हे दुसरे केंद्र असून, त्याचे उद्घाटन सरपंच रावजी शिंगवा, पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, नेरळ पोलीस ठाण्याचे निरिक्षक तानाजी नारनवर, जि.प. माजी सदस्य सावळाराम जाधव, कर्जत पं.स. सदस्य सुजाता मनवे, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे, संतोष शिंगाडे, रेणुका चंचे, जयश्री मानकामे, पार्वती पवार, उमा खडे, गीतांजली देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर काटे आदी उपस्थित होते.