मुरूड ः प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळामुळे काशीद व मुरूड किनार्यावरील असंख्य सुरूची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. ताशी 120 किलोमीटरच्या वार्यापुढे ही झाडे टिकाव धरूशकली नाहीत. मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत. परिणामी सामाजिक वनीकरण विभागाने
समुद्रकिनारी पुन्हा सुरूंच्या झाडाची लागवड करावी, अशी मागणी लोकांकडून होत आहे. तसेच मुरूड येथील समुद्रकिनार्यावर रायगड जिल्हा परिषदेच्या शासकीय विश्रामगृहाच्या मागच्या बाजूचा दगडी बंधारा खचून समुद्राच्या खार्या पाण्याने सुरूंच्या झाडांच्या हद्दीत प्रवेश केल्याने येथील झाडे बाधित होत आहेत. त्यामुळे येथील दगडी बंधार्यांची उंची वाढवावी, अशी मागणीसुद्धा होत आहे.
मुरूड तालुक्यातील काशीद व मुरूड शहरालगत असणार्या समुद्रकिनारी असंख्य सुरूची झाडे आहेत. ही झाडे समुद्रकिनारी येणार्या पर्यटकांचे मोठे आकर्षण असते. झाडांच्या सावलीत असंख्य पर्यटक अल्पोपहार करतात, परंतु निसर्ग चक्रीवादळ व दगडी बंधार्याची उंची न वाढवल्याने समुद्रकिनार्यावरील झाडे उन्मळून पडत आहेत. त्यावर लवकरच उपाययोजना व्हावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे. सागर कन्या मच्छीमार सोसायटीचे उपाध्यक्ष मनोहर मकू यांनी सांगितले की, समुद्रकिनारी असलेले दगडी बंधारे अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहेत. हे बंधारे आता खचल्याने समुद्राचे पाणी सुरूंच्या झाडांना धडकत आहे. निसर्ग चक्रीवादळामुळेही असंख्य झाडे पडली आहेत. सामाजिक वनीकरण विभागाने नवीन वृक्षांची लागवड करावी, तर पतन अभियंता यांच्याकडे दगडी बंधार्यांची उंची वाढवावी यासाठी लवकरच निवेदन सादर करून पाठपुरावा करणार असल्याचे या वेळी मकू यांनी सांगितले.
याबाबत बंदर निरीक्षक हितेंद्र बारापत्रे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, मेरीटाइम बोर्डाकडून दगडी बंधारे बांधले जात नाहीत. पतन अभियंत्यामार्फत सदरचे काम केले जाते. त्यामुळे या कामाशी आमचा संबंध येत नाही. तरी लोकांनी पतन अभियंता कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.