Breaking News

सिलिंडर टाक्या चोरणार्या टोळीचा खालापूर पोलिसांनी लावला छडा

सात जण अटकेत

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील पौध गावाच्या हद्दीत असलेल्या कारखान्यातून सिलिंडर टाक्यांची चोरी करणार्‍या टोळीचा छडा खालापूर पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणी महादेव वामन वाघमारे (वय 42, रा. खानाववाडी), चंद्रकांत मारुती पवार (37, वरोसेवाडी), संतोष बबन अहिरे (23), रामदास बबन अहिरे (25, दोघेही रा. लाखरन, तिवरे, ता. कर्जत) राजेंद्र पांडुरंग घोंगे (45, लोहप), मंगेश वसंत वाघमारे (28, हाळ कातकरवाडी), व्यंकटेश ओबलेश पुजारी (32, देहू रोड, हवेली) यांना अटक करण्यात आली आहे.

पौध गावाच्या हद्दीत असलेल्या कॉन्फीन्डस गॅस प्रा. लि. या कारखान्यामध्ये एल. पी. गॅससाठी सिलिंडरच्या मोकळ्या टाक्या तयार करण्याचे तसेच दुरुस्तीचे काम चालते. कारखान्यातून तीन महिन्यांत दोनदा टाक्या चोरीला गेल्याचे प्रकार घडले होते. जवळपास दोन लाख 38 हजार रुपये किमतीच्या 119 टाक्या चोरीला गेल्याने खालापूर पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते.

पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली होती. सिलिंडर चोरणार्‍या टोळीचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शेखर लव्हे, हवालदार योगेश जाधव, नाईक नितीन शेडगे, रणजित खराडे, सचिन व्हसकोटी, हेमंत कोकाटे व शिपाई दत्तात्रेय किसवे यांचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते.

तपासात खबर्‍या मार्फत खालापूर येथील वणवे गावातील महादेव वामन वाघमारे याचे नाव समजल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता, त्याने साथीदारांची नावे उघड केली. पोलिसांनी या टोळीकडून सुमारे एक लाख 58 हजार रुपये किमतीच्या 79 टाक्या ताब्यात घेतल्या आहेत. या टोळीने देहू रोड, मुंब्रा भागात टाक्या विक्री केल्याचे तपासात समोर आले असून, पोलीस या टोळीतील आणखी साथीदाराचा शोध घेत आहेत. दरम्यान, सर्व आरोपींना खालापूर येथील न्यायालयात हजर केले असता, 25 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

चोरट्यांनी कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता. कारखान्यात सीसीटीव्ही कॅमेरेदेखील नसल्याने तपासाचे मोठे आव्हान होते. वरिष्ठांच्या सूचनेनुसार तपासाला गती देत टोळीचा छडा लावला असून, या टोळीशी संबंधित आणखी काही जणांचा तपास सुरू आहे.

-विश्वजित काईंगडे, पोलीस निरीक्षक, खालापूर

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply