सिडकोने योग्य ती दक्षता घेण्याची मागणी
कळंबोली : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीत अनेक भूखंड मोकळेच आहेत. सदर भूखंडांच्या विकासाकडे सिडकोने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या भूखंडांवर गवताचे जंगल वाढले आहे. आता पावसाळ्यात या भूखंडांना डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याचा त्रास आजूबाजूच्या सोसायट्यांना होऊ लागला आहे. याबाबत सिडकोने योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
कळंबोली, रोडपाली, कामोठे, खारघर, खांदा वसाहत या ठिकाणी महापालिका क्षेत्र असले, तरी मोकळे भूखंड अद्याप सिडकोच्या ताब्यात आहेत. या मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने भूखंडांचे अस्तित्व संपले आहे, तसेच या जागेवर डेब्रिज व कचरा टाकला जात आहे. त्यामुळे उंदीर, घुशी व इतर सरपटणार्या प्राण्यांचा येथे वावर वाढला आहे.
या प्राण्यांचा उपद्रव शेजारच्या वसाहतींना होत आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने सायंकाळी जास्त उपद्रव करतात.
कळंबोली सेक्टर येथील 11 भारत पेट्रोल पंपाजवळील भूखंडावरही पावसाचे पाणी साचले आहे. या जागेवर कचरा, झाडांच्या तुटलेल्या फांद्या टाकण्यात आल्या आहेत. पावसाच्या पाण्यामुळे या फांद्या कुजल्या आहेत. त्यामुळे त्यातून दुर्गंधी येत आहे.
कामोठे सेक्टर 8 या ठिकाणीही पावसाचे पाणी साचल्याने बाजूला राहात असलेल्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिका व सिडकोने संबंधित जागा मालकाला सूचना कराव्यात, तसेच सिडकोने आपल्या मालकीच्या भूखंडांची निगा राखावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
साथीच्या रोगांची भीती
आगोदरच कोरोनाचे संकट आहे. यात पावसाळ्यात उद्भवणार्या साथीच्या रोगांनीही तोंड वर काढले आहे. मोकळ्या भूखंडांवर साचलेले पाणी, घनकचजयामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू व इतर साथीच्या रोगांची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिडको प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.