Breaking News

पेणजवळ अपघातात एक ठार, तिघे जखमी

पेण : प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे कोकणातील मामाच्या गावी अडकून पडलेले कुटुंब पुन्हा घरच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारने शुक्रवारी (दि. 29) सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील हमरापूरजवळील पुलावर एका ट्रकला धडकून दुभाजकावर आदळली. या अपघातात एक महिलेचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत.
मुंबईतील माहीम येथील रहिवासी असलेली निकीता ओमकार सोनावणे (वय 28) ही तिची आई सुनंदा राम शिंदे (53), वडील राम शिवराम शिंदे (59) व पाच वर्षांची मुलगी अधिरा यांच्यासह लॉकडाऊनपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुडाळ येथे मामाच्या गावी गेली होती, मात्र त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात 23 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि पुढे तो वाढतच गेला. त्यामुळे हे कुटुंब मामाच्या गावीच अडकून पडले होते.
तेथून परतण्यासाठी त्यांनी ई-पास काढला आणि सर्वजण माहीम येथील घरी परतीच्या प्रवासाला निघाले. त्यांची क्वालिस (एमएच 04 एएस 1801) गाडी सकाळी 6.45च्या सुमारास महामार्गावर हमरापूर पुलावर आली असता, चालक प्रथमेश सुरेश शिंदे याचे नियंत्रण सुटल्याने ती पुढे जाणार्‍या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात निकिता सोनावणे गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडल्या, तर चालकासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तीन वर्षांची अदिरा बचावली आहे. या अपघातप्रकरणी चालक प्रथमेश शिंदे याच्यावर दादर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply