कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी
पाली ः प्रतिनिधी
सुधागड तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण नुकतेच बरे होऊन घरी परतले होते. तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाण असलेले पाली कोरोनापासून दूर होते, मात्र शनिवारी एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून रविवार (दि. 28) ते बुधवारपर्यंत (दि. 1) पाली बाजारपेठ बंद राहणार आहे.
कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या घरातील 10 जणांना क्वारंटाइन केल्याची माहिती तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली, तसेच पाली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आलाप मेहता तसेच विक्रांत चौधरी यांनी खबरदारी म्हणून पाली बाजारपेठ चार दिवस बंद राहणार असल्याचे सांगितले. सुधागड तालुक्यात मे महिन्यात कोरोनाने शिरकाव केला. नागशेत येथील एका 62 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर 2 जूनला गोमाशी येथील एका 24 वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. काही दिवसांपूर्वी हे दोन्ही रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, मात्र आता पालीत कोरोना रुग्ण सापडल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे.