Breaking News

माणगावात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू

बैठकीत एकमुखी निर्णय

माणगाव ः प्रतिनिधी

मागील 15 दिवसांपासून लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात माणगाव नगरपंचायत हद्दीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने माणगावकरांची चिंता वाढली आहे. शुक्रवारी सायंकाळी एकाच दिवशी कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळल्याने शनिवारी माणगावकर नागरिकांनी खबरदारीच्या हेतूने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एकत्रित येत सोमवार (दि. 29) ते शुक्रवारपर्यंत (दि. 3) जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नगरपंचायत कार्यालय ठिकाणी माणगावातील प्रतिष्ठित नागरिक, नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी, विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, व्यापारी, पत्रकार, औषध विक्रेते तसेच संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी सुरक्षित अंतर ठेवून माणगावात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत चर्चा केली. या चर्चेत सोमवारपासून शुक्रवारपर्यंत सलग पाच दिवस कडकडीत बंद ठेवून जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी औषध विक्रेते संघटनेचे पदाधिकारी निलेश शेट यांनी कोरोनाचे माणगावातील वाढते रुग्ण पाहून चिंता व्यक्त करीत आम्ही औषध दुकाने पाच दिवस बंद ठेवू. ज्यांना कोणाला औषधांची गरज भासेल त्यांच्यासाठी आमचे दुकानदार दुकानांबाहेर आपले नाव व संपर्क क्रमांक लिहितील. गरजूंनी संपर्क साधल्यास त्यांना ताबडतोब औषधे उपलब्ध करून दिली जातील, असे सांगितले. तसेच फक्त परवानाधारक दूध डेअरीवाल्यांची दुकाने सकाळी 6 ते 9 या वेळेतच जनता कर्फ्यूच्या पाच दिवसांत उघडी राहतील.

दूध डेअरीवाल्यांना या कालावधीत केवळ दूध विकण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. इतर सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. याला सर्व माणगावकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या चर्चेवेळी नगराध्यक्ष योगिता चव्हाण, राजिपचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अ‍ॅड. राजीव साबळे, ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, नगरसेवक रत्नाकर उभारे, नितीन वाढवळ, नितीन बामगुडे, सचिन बोंबले, माणगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे सभापती निलेश थोरे, भाजपचे तालुका सरचिटणीस योगेश सुळे, महामूद धुंदवारे, व्यापारी सचिव शरद देसाई, सुरेश जैन, गिरीश वडके, नरेंद्र गायकवाड, दिनेश मेथा, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, सुनील पवार यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापारी उपस्थित होते.

माणगाववासीयांना दिलासा

दरम्यान, संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाची माणगाव तालुक्यातील 27 गावांतून आतापर्यंत 79 जणांना लागण झाली होती. त्यापैकी तालुक्यातील 64 रुग्ण स्वतःच्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर पूर्णपणे ठणठणीत बरे होऊन आपल्या घरी परतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. त्यामुळे माणगाववासीयांना दिलासा मिळाला असून तालुक्यातील इंदापूर व सुर्ले येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply