नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त – संगीत व नाट्यक्षेत्रात अग्रगण्य नाव असलेल्या ’पंचमवेद’ या संस्थेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाचा गजर ऑनलाइन पद्धतीने झाला. ’मोगरा फुलला’ या शीर्षकाखाली झालेल्या एका दृकश्राव्य कार्यक्रमात सहभागी कलाकारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या घरातूनच सादरीकरण केले.
पंचमवेद संस्थेचे निर्माता व प्रसिद्ध व्हायोलीनवादक विजय मनोहर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. रेणुका दलाल, प्रवरा जोशी, शलाका देशपांडे, महेश घाटे, प्रसाद जोशी अशा दिग्गज गायक कलाकारांनी यामधे संतांच्या अभंगरचनांचे सादरीकरण केले. भक्तीभावपूर्ण नृत्य साकारणारी सई गांगल, कवितावाचन करणारी सानवी अंबेकर व विठ्ठलाची भूमिका साकारणारा चार वर्षांचा निषाद मनोहर या बालकलाकारांच्या सहभागाने कार्यक्रम
रंगतदार झाला. विजय मनोहर यांनी सिंथेसायजर व अॅड. अतुल जोशी यांनी तबलासाथ केली. मिलिन्द गांगल आणि डॉ. निखिल मनोहर यांनी भावपूर्ण व अभ्यासू निवेदनाने कार्यक्रमाची उंची वाढवली. गंधार देशपांडे, शलाका देशपांडे यांनी तंत्रसहाय्याने कार्यक्रम प्रेक्षणीय केला.