Breaking News

ग्रामीण रुग्णालय कशेळेकडून रुग्णांची लूटमार सुरूच

केसपेपरसाठी प्रत्येकी पन्नास रुपयांची मागणी

कर्जत : प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांचे आणि त्यातही आदिवासी लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उभारलेले कशेळे ग्रामीण रुग्णालय रुग्णांना सेवा देण्याऐवजी नाहक त्रास देतांना दिसत आहे. रुग्ण तपासणी करण्यासाठी आल्यानंतर यांच्याकडून 10 रुपये आकारून केसपेपर बनवला जातो, पण कशेळे ग्रामीण रुग्णालय रुग्णांकडून चक्क 50 रुपये घेत असल्याबद्दल स्थानिक रुग्णांनी संताप व्यक्त केला आहे.

कशेळे ग्रामीण रुग्णालय शासनाने आदिवासी लोकांसाठी उभे केले. त्यावेळी स्थानिक लोकांनी रुग्णालयाचा उपयोग गरीब लोकांना होणार म्हणून जमीन दिली आणि त्या जागेवर रुग्णालय उभे राहिले. या रुग्णालयात कधी डॉक्टर तर कधी कर्मचारी नसतात. त्यामुळे रुग्णांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या काही वर्षात कशेळे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची वेगवेगळ्या प्रकारे लूट केली जाते. याकडे अधिकार्‍यांनी गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे.

अनेक वेळा याबाबत प्रसारमाध्यमांतून आवाज उठवूनदेखील कोणी लक्ष देत नाही ही बाब दुर्दैवी आहे. गोरगरिबांना मोफत औषधोपचार व्हावेत या करिता माझ्या बाबांनी दवाखान्याला मोफत जागा दिली, परन्तु रुग्णांची लूटमार करणार्‍या डॉक्टरवर शासनाचा कोणताही अंकुश राहिला नसल्याचा आरोप कशेळे येथील कार्यकर्ते उदय पाटील यांनी केला आहे.

उदय पाटील यांना फोन करून काही आदिवासी लोकांकडून रुग्णालयामध्ये केसपेपरची किंमत दहा रुपये आणि त्यांच्या व्यतिरिक्त पन्नास रुपये अधिक उकळले जात असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी रुग्णालयात जाऊन ड्युटीवर असलेले डॉ.संजय धनगावे यांची भेट घेऊन या बाबत जाब विचारला. डॉ. संजीव हे त्या ठिकाणी प्रति रुग्ण पन्नास रुपये घेण्याचा सरकारचा आदेश आहे असे सांगितले. आपल्या बोर्डवर असा काही उल्लेख नाही, असे उदय पाटील यांनी दाखवून दिल्यानंतर लवकरच असा निर्णय होणार आहे, असे डॉ.संजीव यांनी सांगितले. त्यामुळे सरकारचा निर्णय होण्याआधी कशेळे ग्रामीण रुग्णालयात रूग्णांकडून पन्नास रुपये आकारले जात असल्याबद्दल रुग्णांनी संताप व्यक्त केला आहे.

आपल्याला उदय पाटील यांचा फोन आला आणि त्यांनी फोन करून या बाबतची मला माहिती दिली. त्यांनी संबंधित डॉक्टरला या पुढील रुग्णाकडून जास्त पैसे घेऊ नका अशी सूचना केली आहे. काही वेळाने पाटील स्वतः रुग्णालयात आले असता असा कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती पाटील यांना आपण दिली आहे.

-डॉ. संजय धनगावे, अधीक्षक  कशेळे ग्रामीण रुग्णालय

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply