Breaking News

उत्सव झालाच पाहिजे

एरव्ही वैष्णवांच्या गर्दीने फुलणारी पंढरी यंदा कोरोनाच्या सावटामुळे आषाढी एकादशीला सुनीसुनीच राहिली असली तरी परंपरेनुसार संतांच्या मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या, पायी वारी रद्द झाली असली तरी प्रत्येक पालखीसोबत काही वारकरी एसटीने का होईना पंढरपुरात आलेच. पहाटेची विठोबा-रखुमाईची शासकीय पूजादेखील रिवाजानुसार पार पडली. असाच आटोपशीरपणा राखत परंपरेनुसार गणेशोत्सवही साजरा व्हायला हवा. गेल्या वर्षाच्या अखेरीस चीनमध्ये कोरोना हा घातक विषाणू अवतरला आणि बघता बघता जगभरातील कित्येक देशांमध्ये त्याचा वेगाने फैलाव झाला. कोरोनाने अवघे दैनंदिन जनजीवनच जेथे ठप्प झाले तेथे मोठ्या कार्यक्रम-सोहळ्यांची काय बात? 2020च्या टोकयो ऑलिम्पिक्सपासून अनेक नामांकित क्रीडा सोहळे आणि सांस्कृतिक उत्सव एकापाठोपाठ एक रद्द झाले. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या फैलावाला जागतिक महामारी संबोधल्यानंतर या संकटाची भयावहता लक्षात घेऊन आयोजकांना हे पाऊल उचलणे भाग पडले. आपल्याकडेही केंद्र सरकारने शिताफीने पावले उचलीत देशभरात कठोर लॉकडाऊनची घोषणा केली. हे संकट दीर्घकाळ जनजीवन विस्कळीत करणार आहे हे मार्च महिन्यातच सरकारच्या लक्षात आले होते. कोरोनाला अटकाव करण्यासाठी केंद्र सरकार आणि तमाम राज्य सरकारांनी नुकती कंबर कसली असतानाच दिल्लीत जमून नंतर देशभर परतून गेलेल्या तबलिगींनी कोरोना देशभर पसरवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गर्दीचे कार्यक्रम कोरोनाच्या काळात कसे जिवावर बेतू शकतात हे तबलिगींच्या उदाहरणांतून अवघ्या देशाने पाहिले. सरकारकडून सर्व प्रकारच्या धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय आदी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी लादण्यात आलीच होती. इतकेच काय सर्वधर्मीय प्रार्थनास्थळेही बंद ठेवणे भाग पडले. पहिल्या कठोर लॉकडाऊनच्या काळातच ही लढाई लांब पल्ल्याची असल्याचे पुरते स्पष्ट झाले आणि येत्या काळात जनजीवनातील कोणकोणत्या गोष्टी टप्प्याने सुरु करता येतील याचा विचारही सुरु झाला. भारत हा अनेक सणवार-उत्सव यांचा देश असून हे सांस्कृतिक घटक आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. स्वाभाविकच सणवारांचे, उत्सवांचे यंदा काय करायचे याची चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रातील पायी वारी हे तर आपले सांस्कृतिक वैभव. परंतु लाखोंची गर्दी कोरोनाच्या काळात परवडणारीच नव्हती. त्यामुळे स्वाभाविकच पंढरपुरातील आषाढी एकादशीच्या सोहळ्याचे आटोपशीर आयोजन करण्यात आले. परंपरा आणि श्रद्धा यांचे खूप जवळचे नाते आहे आणि अत्यंत कठीण समयी जिथे विज्ञान हात टेकते तेथे श्रद्धाच माणसाला सावरते. वारीसोबतच दहीहंडी आणि गणेशोत्सवाचीही चर्चा सुरुच होती. दहीहंडी उत्सवात गेली काही वर्षे चाललेल्या अतिरेकामुळे त्यावर निर्बंध आणण्याची चर्चाही थेट न्यायालयापासून सामाजिक व्यासपीठापर्यंत होतच आली आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय, कोरोनाचे संकट लक्षात घेऊन बहुतेक मोठ्या आयोजकांनी आपापले दहीहंडी उत्सव यंदा रद्दच केले आहेत. गणेशोत्सवाचे मात्र तसे नाही. हा देखील सार्वजनिक आणि सामाजिक उत्सव असला तरी गणेशावरील श्रद्धेची मुळे जनमानसात खोलवर रुजलेली आहेत. या श्रद्धेतूनच या उत्सवाची लोकप्रियता अमराठी जनांमध्येही उदंड वाढते आहे. त्यामुळेच मूर्तीची स्थापना न करण्याचा लालबागच्या राजाच्या मंडळाचा निर्णय अनेकांना पटलेला नाही. लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करुन परंपरेचा मान राखला गेला पाहिजे हे भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आशिष शेलार यांचे म्हणणे व्यापक जनमतच व्यक्त करते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply