नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोरोना चाचणीसाठी लागणारा विलंब यापुढे थांबणार आहे. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी महानगरपालिकेने खासगी लॅबशी करार केला असून, यापुढे एक ते दोन दिवसांत अहवाल उपलब्ध होणार आहेत.
नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 13 मार्चपासून शहरातील 21,329 जणांची स्वॅब तपासणी केली आहे. यापैकी 19,843 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, अद्याप 1,486 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. वेळेत अहवाल न मिळाल्यामुळे उपचार सुरू करण्यासही विलंब होत आहे. यापूर्वी वेळेत अहवाल न मिळाल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर चार ते पाच दिवसांनी अहवाल मिळाला आहे. 5 ते 15 दिवस अहवाल मिळाला नसल्याचीही उदाहरणे आहेत. नेरुळमधील एक युवतीचा अहवाल 15 दिवसांनंतर मिळाला. अहवाल पॉझिटिव्ह आला, परंतु तोपर्यंत ती युवती पूर्णपणे बरी झाली होती. या घटनांमुळे शहरवासीयांमध्ये आरोग्य विभागाविषयी नाराजी वाढू लागली होती. ही समस्या सोडविण्यासाठी मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कृष्णा डायग्नोसिस या खासगी लॅबशी
करार केला आहे.
यामुळे आता एक ते दोन दिवसांत स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त होणार आहे. ही लॅब त्यांच्या सीएसआर निधीतून शासनमान्य दरामध्ये महानगरपालिकेस सवलत देणार आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने केलेल्या कराराप्रमाणे सीसीसी, डीसीएचसी, डीसीएच कोविड रुग्णालयीन सुविधांपासून प्रतिदिन 500 स्वॅब नमुने घेऊन जाण्याचे मान्य केले आहे. वेळेत अहवाल न मिळाल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापार्श्वभूमीवर आयुक्त मिसाळ यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.