Breaking News

कर्नाळा बँक गैरव्यवहार  प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

पनवेल : रामप्रहर वृत्त
शेकाप नेते माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 512 कोटी 54 लाख 53 हजार रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाचा तपास राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आला आहे. गत फेब्रुवारी महिन्यामध्ये या प्रकरणी कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्जदार अशा एकूण 76 जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू होता. आता सीआयडी सखोल तपास करणार आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्नाळा बँकेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीनंतर रिझर्व्ह बँकेने सन 2018मध्ये बँकेची तपासणी केली होती. या तपासणीत अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्याने रिझर्व्ह बँकेने सहकार आयुक्तांना बँकेचे विशेष लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रायगड जिल्हा सहकारी संस्थेचे वर्ग-1चे विशेष लेखा परीक्षक उमेश तुपे यांनी कर्नाळा बँकेचे लेखा परीक्षण केले होते.
बँकेचे अध्यक्ष व शेकाप नेते विवेक पाटील यांनी मनमानीपणे काम केले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला. विशेष लेखा परीक्षणात कर्नाळा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी बँकेचे कर्जविषयक धोरण तसेच आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे 63 बोगस कर्जदार तयार करून तसेच अनेक कर्ज प्रकरणांत बनावट कागदपत्रे वापरून बँकेतील कोट्यवधी रुपयांचा अपहार करून बँकेचे ठेवीदार व शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले होते.
अशा प्रकारेे कर्नाळा बँकेच्या संचालक मंडळाने व कर्जदारांनी गैरव्यवहार करून 633 कोटींपैकी 512 कोटी 54 लाख 53 हजार रुपयांचा अपहार करून बँक डबघाईला आणल्याचे आढळलल्यानंतर गत फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष लेखा परीक्षक उमेश तुपे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी कर्नाळा बँकेच्या अध्यक्षासह संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्जदार अशा एकूण 76 जणांवर फसवणुकीसह अफरातफर, बनावटगिरी तसेच सहकारी संस्था अधिनियम कलम 147सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सुरू होता. या प्रकरणाची व्याप्ती पाहता राज्याच्या पोलीस महासंचालकांनी गुन्ह्याचा पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हा गुन्हा आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.

Check Also

भव्य कटआऊट्स; चित्रपटाचं मोठेपण त्यातही

आज सगळीकडेच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ची जबरदस्त क्रेझ आहे. चित्रपट शौकिनांपासून इतिहासाचे अभ्यासक आपापल्या पद्धतीनुसार …

Leave a Reply