खोपोली ः प्रतिनिधी
कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांनी दुसर्यांदा राजीनाम्या दिल्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते घायाळ झाले असून पदाधिकार्यांमार्फत लाड यांची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे, पण लाड हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने सध्या तरी रायगड जिल्हा राष्ट्रवादीत चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले आणि गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ माजी मंत्री व विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्याशी मैत्रीचे नाते असलेले सुरेश लाड यांनी दुसर्यांदा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचे नियोजन जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी केले होते, मात्र उरणच्या कार्यक्रमातून लाड तडकाफडकी निघून गेले. कर्जतच्या शेळके हॉलमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही लाड यांची गैरहजेरी खूप काही सांगून गेली. त्याच मेळाव्यात लाड यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पीएमार्फत पाठवून दिल्याने खळबळ उडाली आहे.मेळाव्यात ना. जयंत पाटील यांनी महामंडळांच्या अध्यक्षांच्या यादीत सुरेश लाड यांचे नाव अव्वल क्रमांकावर असल्याचे सांगून लाड समर्थकांना गोंजरण्याचा प्रयत्न केला, मात्र लाड आता दुसर्यांदा माघार घेण्यास तयार नाहीत. ते कुठल्या पक्षात जाणार हे आजही गुलदस्त्यात आहे, पण वरिष्ठ मनधरणी करण्यात अयशस्वी झाली, तर त्यांचे पक्षांतर अटळ आहे आणि त्याचा फटका पक्षाला बसेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे कर्जत-खालापूर मतदारसंघात आगामी 2024मध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी सध्या असलेली तीन पक्षांची आघाडी कायम राहिली, तर विद्यमान आमदार शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे उमेदवारीवर आपला हक्क सांगतील. मग लाड आमदारकी कसे लढणार? त्यामुळेच येत्या दोन दिवसांत प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेऊन ते आपला निर्णय घोषित करण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संदर्भात राष्ट्रवादीचे खालापूर तालुका अध्यक्ष नरेश पाटील यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या वृत्ताचा इन्कार केला. ते म्हणाले, माझी याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली आहे. सुरेश लाड हे राष्ट्रवादी सोडणार असल्याचे वृत्त चुकीचे असून असा कोणताही निर्णय त्यांनी घेतला नाही. दुसरीकडे सुरेश लाड यांचे समर्थक मात्र अस्वस्थ आहेत. पक्षासाठी एवढे करूनही अन्याय होत असेल, तर दुसरा मार्ग चोखाळणे योग्य ठरेल, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे लाड काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे.