Breaking News

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही

पनवेल : प्रतिनिधी
येथे साकारत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल. त्यामुळे तुमच्या मनातील असलेल्या शंका काढून टाका. आमच्या या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील आमदारांचे काम चांगले आहे. जनता त्यांच्या सोबत आहे. मला विश्वास वाटतो पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल आणि या ठिकाणी दोन्ही आमदार प्रचंड मतांनी निवडून येतील, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. ते शुक्रवारी (दि. 15) करंजाडे येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
उरण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी करंजाडे येथे जाहीर सभा झाली. या सभेला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, ज्येष्ठ नेते कर्णा शेलार, सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, समीर केणी, सुभाष म्हात्रे, माजी पं.स. सदस्य रेखा म्हात्रे, रूपेश धुमाळ, राकेश गायकवाड, प्रकाश पाटील, शिवसेनेचे रूपेश पाटील, संदेश पाटील, राष्ट्र्वादीचे जयसिंग पाटील, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते.
या वेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी सांगितले की, राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. राज्यातील पुणे आणि नवी मुंबई या दोन विमानतळांचे नामकरण करण्यात येणार आहे. पुण्याला संत तुकाराम महाराजांचे, तर नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव दिले जाईल. खारघर येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.बा. पाटील यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्यामुळे तुमच्या मनातील शंका आता काढून टाका. एक लाख टक्के त्यांचेच नाव दिले जाईल. दिलेले वचन मी पूर्ण करणार आहे.
या विमानतळासाठी ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या त्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी त्यांच्या नोकरीचा विषय असेल किंवा मोबदल्याचा विषय असेल तो मला हक्काने सांगा. मी पूर्ण करून देईन, मागे हटणार नाही. या ठिकाणी दोन रनवे आहेत, पण तिसर्‍या आणि चौथ्या रनवेच्या शक्यतेच्या रिपोर्टवर आता काम सुरू आहे. त्यामुळे विस्थापित होणार्‍या पाच गावांचे पुनर्वसन आणि त्यांना योग्य मोबदला दिला जाईल, असे आश्वासन ना. मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
या निवडणुकीचा नुकताच एक सर्वे आला आहे. त्यानुसार महायुतीच्या 185-190च्या आसपास जागा निवडून येऊन पुन्हा महायुतीचे सरकार येईल. त्यामध्ये उरणमध्ये आमदार महेश बालदी निवडून येण्याचे स्पष्ट दिसत आहे. विकसित भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहिले. दहा वर्षे जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली. तिच्याकडे मी विकसित भारताचा पाया म्हणून पाहत असल्याचे ते सांगतात. जागतिक स्तरावर आपण आज पाचव्या अर्थव्यवस्थेवर आलो. एका बाजूला जागतिक स्तरावर देशाचे नाव मोठे करणे आणि दुसर्‍या बाजूला देशातील जनतेच्या हिताचा ही विचार करणे ही भूमिका घेऊन मोदीजी काम करीत आहेत. राज्यातही आपल्या महायुतीचे सरकारने अडीच वर्षात 52 टक्के विदेशी गुंतवणूक आणली हे आपले यश आहे. अनेक विकासाची कामे अडीच वर्षात करण्यात आली. सामन्यांच्या हिताचा विचार करून लाडकी बहीण योजना, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि युवकांचे प्रश्न सोडवले. जनकल्याणाच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. साडेपाच हजार कोटींची कामे या विधानसभा मतदारसंघात केली आहेत. पनवेल-उरण मार्गावरील नवीन पूल करण्याची मागणी आमदार महेश बालदी पूर्ण करतील, असेही ना. मोहोळ म्हणाले.
खासदार श्रीरंग बारणे यांनी आमदार महेश बालदी यांच्या कामाचे कौतुक केले. 2014मध्ये आमदार असलेल्यांनी किती निधी आणला व त्यांच्या कामाची पद्धत याची तुलना त्यांनी केली. महेश बालदी यांनी या भागाचा कायापालट करताना राज्य सरकारच्या अनेक योजना राबवल्या. येथील पाण्याचा, रस्त्याचा प्रश्न राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवला. सकारात्मक काम केले आहे. महेश बालदी सगळ्या गोष्टी करतात याची खंत विरोधकांना आहे. या भागात चांगल्या योजना मार्गी लागण्यासाठी त्यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बोलताना उलवे येथील गर्दी पाहिल्यावर मी भविष्य वर्तवले होते की, आमदार महेश बालदी पुन्हा आमदार होणार. आज येथे आल्यावर गर्दी पाहून वाटते मागच्यापेक्षा या वेळी जास्त आघाडी घेऊन निवडून येतील असे चित्र दिसायला लागले असल्याचे सांगितले.
आमदार महेश बालदी हे उरणच्या नगरपालिका शाळेत व इथल्याच कॉलेजमध्ये शिकले आहेत. त्यामुळे आपला देश एक असताना जे लोक ते इकडचा-तिकडचा करतात त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. एखादी व्यक्ती 15 वर्षे इथे राहिली की ती स्थानिक होऊन जाते. ते पिढ्यान्पिढ्या इथे राहिलेले आहेत. येथील लोकांची ते कामे करतात. त्यांचा वावर आगरी, कोळी, कर्‍हाडी, परप्रांतियांपासून अगदी मराठा समाजामध्येसुद्धा असतो. भविष्यात प्रश्न सोडवण्यासाठी व विकासाची कामे करण्यासाठी हक्काची माणसे लागतात. यासाठी त्यांना निवडून देणे गरजेचे आहे, असे लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले. या वेळी त्यांनी विस्थापित होणार्‍या पाच गावांनाही तोच न्याय देण्याची मागणी केली.
आमदार महेश बालदी यांनी, पुढील पाच वर्षात उरण मतदारसंघातील आदिवासीवाडीतील एकही घर कुडाचे राहणार नाही. सर्वांना पक्की घरे मिळतील, असे सांगून करंजाडे नोड आधुनिक बनविल्याशिवाय राहणार नाही. आता पाच हजार कोटींची कामे केली. पुढील पाच वर्षात 15 हजार कोटींची कामे करणार असल्याचे सांगितले. या वेळी सरपंच मंगेश शेलार, रूपेश पाटील, रेखा म्हात्रे, अतुल पाटील यांचीही भाषणे झाली. त्यांनी आमदार महेश बालदी यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply