पेण ः प्रतिनिधी
देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात ऑक्सिजनअभावी काही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूही ओढवला आहे. त्या पार्श्वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन सिलिंडर किट द्यायचा निर्धार करून तो पूर्णही केला.
सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी 40 हजारांची रक्कम जमा करून सर्व किट घेण्यात आले. संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर गडब, वाशी, कामार्ली, जिते या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांत जाऊन त्याचे वाटप करण्यात आले. कोरोनासोबत लढणार्या डॉक्टर आणि कर्मचार्यांना रुग्णांचे जीव वाचविण्यसाठी फूल ना फुलाची पाकळी स्वरूपात उपयुक्त अशी वस्तू देऊ शकलो याबद्दल प्रतिष्ठानच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
आपल्या जवळील कोणी पीडित असेल तर जमेल तशी मदत करण्याचा निर्धार सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केल्याचे अध्यक्ष समीर म्हात्रे यांनी सांगितले. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनीही या उपक्रमाबद्दल सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांचे आभार मानले. या वेळी स्वप्नील म्हात्रे, सुभाष टेंबे आदींसह सदस्य उपस्थित होते.