मुंबई : प्रतिनिधी
नवरात्र, रामलीला अशा हिंदू सणांमध्ये घातपात करणाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यात महाराष्ट्रातून जान मोहम्मद शेखला धारावीतून स्पेशल सेलने अटक केली. मुंबईत आणि राज्यात अशी कट कारस्थाने सुरू असताना महाराष्ट्र राज्याचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलेय का, असा सवाल भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे. पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावामुळे त्यांचे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतेय, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. मुंबईत बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना शेलार म्हणाले, नॉन कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे राज्याचे पोलीस, पत्रकारांना हात नाही पाय लावू अशी भाषा करणारे पोलीस, विद्यमान आमदाराला लूकआउट नोटीस काढण्याचा प्रताप करणारे पोलीस दहशतवाद्यांच्या बाबतीत का झोपले होते हे गृहमंत्री स्पष्ट करतील का? या दहशतवादी प्रकरणाची इंटेलिजन्स माहिती पोलिसांना, गृहमंत्र्यांना होती तर मग एका विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका असे राजकीय प्रकरण नाही ना, असा सवाल करत पोलिसांच्या इंटेलिजन्स फेल्युअरवर गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. आता सरकार बैठका घेत असले तरी झालेल्या अक्षम्य दुर्लक्षावर आता पांघरुण घालता येणार नाही. राज्यकर्ते पोलिसांचे लक्ष नको त्या विषयात घालतात मग अशा घटना घडतात. आमचे पोलीस सक्षम आहेत, पण राजकीय दबाव, सरकारची गटबाजी, वसुलेबाजी आणि सौदेबाजी यामुळे ही स्थिती आली असेही ते म्हणाले. चौकशी अजून वाढवावी आणि गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन शेलार यांनी केले आहे.
राजकीय अस्मितेचा धंदा शिवसेनेने बंद करावा
परप्रांतीयांची नोंद ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य असंवेनशील असल्याचे सांगत प्रत्येक विषयावर अस्मितेचा राजकीय धंदा शिवसेनेने सुरू केला असल्याची टीका शेलार यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याला आमचा शंभर टक्के आक्षेप असून गुन्हा आणि पीडितेबाबत असंवेदनशीलता दाखवणार हे वक्तव्य आहे. प्रत्येक विषयावर अस्मितेचा राजकीय धंदा शिवसेनेने सुरू केला असून वाढत्या गुन्हेगारीवर बोलण्याऐवजी येणार्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांचे लक्ष वळवण्याचा हा प्रयत्न आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper