Breaking News

ईटीपीबीएस मतपत्रिकांची सुविधा

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाकडून विशेष प्रयत्न

मुंबई ः प्रतिनिधी :  लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस दलातील जवान (सर्व्हिस व्होटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी भारत निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम (ईटीपीबीएस) उपलब्ध करून दिली आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख 8 हजारांहून अधिक सर्व्हिस व्होटर्सची नोंद झाली असून त्यांच्यापर्यंत इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका पोहचवल्या जाणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाने सी-डॅकच्या साहाय्याने ईटीपीबीएस यंत्रणा विकसित केली आहे. 2016 मध्ये पुद्दुचेरी विधानसभेच्या नेल्लीथोप मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा ईटीपीबीएसचा वापर करण्यात आला. या यंत्रणेच्या माध्यमातून मतपत्रिका ऑनलाइन सर्व्हिस व्होटर्सपर्यंत पोहचवल्या जातात. लष्करी दले अथवा अन्य सर्व्हिस व्होटर्स असलेल्या सेवांमधील नोडल अधिकारी सर्व्हिस व्होटर्सचे ईटीपीबीएससाठीचे अर्ज जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांकडे (डीईओ) पाठवितात. डीईओंनी जिल्ह्यातील सर्व्हिस व्होटर्सची यादी संबंधित मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकार्‍यांकडे

(इआरओ) पाठविल्यानंतर इआरओ या अर्जावर निर्णय घेतात.

मतदानाच्या साधारणतः 10 दिवसांपूर्वी सर्व्हिस व्होटर्सना ईटीपीबी यंत्रणेद्वारे ऑनलाइन पद्धतीने मतपत्रिका पाठविल्या जातात. मतपत्रिकांचा पारंपरिक पद्धतीने पोस्टाद्वारे होणारा मतदारांपर्यंतचा एका बाजूचा प्रवास वाचण्यासह निवडणूक प्रशासनावरील बराचसा ताण कमी होतो. या मतपत्रिका डाऊनलोड आणि प्रिंट काढून मतपत्रिकेवर आपले मत नोंदविल्यानंतर विहित पद्धतीने पोस्टाने पाठविणे आवश्यक असते. पोस्टल मते पाठविण्यासाठी कोणतेही टपाल तिकीट लावण्याची आवश्यकता नसते.

यावर्षी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात 1 लाख 4 हजार 435 इतक्या सर्व्हिस व्होटर्सची संख्या असून त्यात आतापर्यंत सुमारे 4 हजारांची भर पडली आहे. सर्व्हिस व्होटर्स नोंदणीची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. अंतिम मतदार यादीनुसार 1 लाख 2 हजार 617 पुरुष, तर 1 हजार 818 महिला सर्व्हिस व्होटर्स आहेत. सर्वाधिक सर्व्हिस व्होटर्स सातारा लोकसभा मतदारसंघात असून सर्वांत कमी मुंबई उत्तर मतदारसंघात आहेत.

अंतिम मतदार यादीनुसार मतदारसंघनिहाय सर्व्हिस व्होटर्सची संख्या

नागपूर 806, भंडारा-गोंदिया 2 हजार 612, गडचिरोली-चिमूर 1 हजार 239, चंद्रूपर 1 हजार 556, यवतमाळ-वाशिम 1 हजार 319, वर्धा 1 हजार 325, रामटेक  1 हजार 584, हिंगोली 1 हजार 131, नांदेड 1 हजार 422, परभणी 1 हजार 259, बीड 4 हजार 8, उस्मानाबाद 3 हजार 321, लातूर 2 हजार 975, सोलापूर 1 हजार 591, बुलडाणा 3 हजार 823, अकोला 3 हजार 266, अमरावती 2 हजार 435, जालना 2 हजार 5, औरंगाबाद 1 हजार 290, जळगाव 5 हजार 640, रायगड 1 हजार 330, पुणे 696, बारामती 2 हजार 93, अहमदनगर 6 हजार 683, रावेर 1 हजार 812, माढा 4 हजार 354, सांगली 5 हजार 692, सातारा 8 हजार 701, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 980, कोल्हापूर 5 हजार 738, हातकणंगले 3 हजार 709, नंदुरबार 902, धुळे 3 हजार 57, दिंडोरी 3 हजार 851, नाशिक 2 हजार 638, पालघर 274, भिवंडी 285, कल्याण 471, ठाणे 534, मुंबई उत्तर 117, मुंबई वायव्य 147, मुंबई ईशान्य 317, मुंबई उत्तर मध्य 133, मुंबई दक्षिण मध्य 192, मुंबई दक्षिण 220, मावळ 597, शिरूर 1 हजार 818 आणि शिर्डी 2 हजार 487.

पात्र कोण?

सेवेनिमित्त आपल्या मतदारसंघाच्या बाहेर असलेले लष्करी, निमलष्करी दलातील जवान

केंद्रीय सशस्त्र पोलीस बलांमधील जवान

निवडणूक कालावधीत राज्याबाहेर कर्तव्यावर असलेले राज्य शासनाच्या सशस्त्र पोलीस बलांमधील जवान

जवानांबरोबर निवास करत असलेल्या त्यांच्या पत्नी

परदेशात शासकीय सेवा बजावत असलेले भारतीय शासकीय सेवेतील अधिकारी-कर्मचारी.

वैशिष्ट्ये

ईटीपीबीएस यंत्रणेला द्विस्तरीय सुरक्षितता लाभलेली आहे.

इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट डाऊनलोड करण्यासाठी ओटीपी आणि पिन नंबर आवश्यक.

युनिक क्यूआर कोडमुळे पोस्टल मतपत्रिकेची सुरक्षितता राखली जाण्यासह नक्कल (डुप्लिकेशन) होऊ शकणार नाही.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply