Breaking News

अपहत चिमुरड्याची सुखरूप सुटका

पुणे ः प्रतिनिधी : दहा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या दोन वर्षांच्या मुलाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. पोलिसांनी 11 तासांमध्ये अपहरण करण्यात आलेल्या चिमुरड्याची सुटका केली, मात्र अपहरणकर्ते पोलिसांच्या हाती लागू शकले नाहीत. सध्या पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

वडाची वाडी येथील बंगल्याच्या आवारात खेळत असताना दोन वर्षांच्या पुष्कराज धनवडेचं शनिवारी संध्याकाळी अपहरण झालं. पुष्कराजचे वडील सोमनाथ धनवडे व्यावसायिक आहेत. साडेसातच्या सुमारास अपहरण झाल्यानंतर थोड्याच वेळाने अपहरणकर्त्यांनी सोमनाथ यांना फोन करून 10 लाखांची खंडणी मागितली. सोमनाथ यांनी याबद्दलची माहिती तातडीने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांची विविध पथके कामाला लागली. अपहरणकर्ते हे उंड्री परिसरात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी, कर्मचारी असा 70 ते 80 जणांचा फौजफाटा रात्री उंड्रीमध्ये दाखल झाला. त्यांनी या परिसरातील एक एक जागा पिंजून काढण्यास सुरुवात केली.

युनिट 6चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण व त्यांचे कर्मचारी उंड्री भागातील सेक्टर 49 मध्ये शोध घेत होते. पहाटेच्या सुमारास त्यांना तेथे एका बाजूला तीन ओसाड बंगले आढळले. त्यांनी या बंगल्याची झडती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा एका बंगल्यात हालचाल जाणवली. तेव्हा त्यांनी आपल्या पथकाला सावध केले. या बंगल्याला दारं नव्हती. त्यांनी आत प्रवेश केला असता बंगल्याच्या तारेच्या कंपाऊंडवरून एक जण पळून जाताना दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता पुष्कराज तेथे आढळून आला. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख व त्यांच्या सहकार्‍यांनी रात्रभर अपहरणकर्त्यांचा शोध घेऊन पुष्कराजची सुटका करण्यात यश मिळवले़.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply