Breaking News

कोरोना रुग्णांसाठी किमान 1000 बेडचे सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून द्या!

  • आमदार प्रशांत ठाकूर यांची आग्रही मागणी
  • मुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्र्यांना निवेदन सादर

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल व उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी सिडकोच्या माध्यमातून तातडीने किमान 1000 बेडचे सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून देण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार ठाकूर यांनी निवेदनही दिले आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल, उरण तसेच नवी मुंबईतील शेतकर्‍यांच्या जमिनी सिडकोमार्फत निरनिराळ्या प्रकल्पांसाठी अगदी तुटपुंज्या दरात संपादित करण्यात आलेल्या असून, त्याबदल्यात सिडकोला प्रचंड फायदा झाला आहे. सद्यस्थितीत सिडकोचे पनवेल व उरण तालुक्यांमध्ये मोठी गुंतवणूक असलेले विकास प्रकल्प सुरू आहेत. ज्या पनवेल व उरण तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जमिनींवरील प्रकल्पांवर सिडको नावारूपाला आली त्या दोन्ही तालुक्याच्या हद्दीतील कोरोना रुग्णांना आरोग्य सेवा पुरवणे सिडकोचे प्रथम कर्तव्य आहे. मुलुंड येथे सिडकोने 1200 बेडचे कोविड रुग्णालय उभारले आहे. त्याच धर्तीवर पनवेल व उरण तालुक्यातील कोरोनाबाधितांसाठी किमान 1000 बेडचे कोविड रुग्णालय तातडीने उभे करणे गरजेचे आहे. याखेरिज पनवेल व उरण तालुक्यातील मोठ्या क्षमतेच्या हॉस्पिटल्सना आवश्यक ते वैद्यकीय साहित्य पुरविण्यास सिडकोने पुढाकार घेतल्यास अशा हॉस्पिटल्सबरोबर
करार करून सिडको अथवा शासन नागरिकांना विनामूल्य वा कमीत कमी दरात कोरोनावर उपचारावर मदत मिळवून देऊ शकते.
पनवेल, उरण तालुक्यांसह रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सिडकोने तातडीने पावले न उचलल्यास सापत्न वागणुकीच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या बाबतीत तातडीने पावले उचलावित आणि पनवेल व उरण तालुक्यातील जनतेला सिडकोमार्फत सुविधा निर्माण करून द्यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री व नगरविकासमंत्री यांच्याकडे केली आहे. या निवेदनाची प्रत माहितीस्तव रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनाही देण्यात आली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply