चार सामन्यांत चार संघांना घरचा रस्ता
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बांगलादेशवरील विजयासह भारतीय संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे, तर या पराभवामुळे बांगलादेश स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे. अशाप्रकारे भारताविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्याने विश्वचषकातून बाहेर गेलेला बांगलादेश हा काही पहिला संघ नाही. मागील चार सामन्यांत भारताचा विजय आणि पराभव निर्णायक ठरला आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने 11 धावांनी विजय मिळवला. 224 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 213 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताच्या या विजयामुळे अफगाणिस्तान स्पर्धेबाहेर गेला.
भारताचा पुढचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध झाला. या सामन्यात भारताने 125 धावांनी विजय मिळवला. 286 धावांचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाला केवळ 143 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताच्या या विजयामुळे विंडीजजचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून पर्यायाने स्पर्धेतून बाहेर पडला.
विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला पराजय इंग्लंडविरुद्ध खेळताना 31 धावांनी झाला. इंग्लंडसाठी हा सामना करो या मरो प्रकारचा होता. त्यामुळेच चांगली फलंदाजी करीत इंग्लंडने भारतासमोर 338 धावांचे आव्हान ठेवले, मात्र भारताला नियोजित 50 षटकांमध्ये 306 धावांपर्यंत मजल मारता आली नाही आणि भारताचा पराभव झाला. भारताच्या या पराभवामुळे श्रीलंकन संघाच्या उपांत्य फेरीत जाण्याचा आशा पूर्णपणे मावळल्या आणि पर्यायाने अफगाणिस्तानपाठोपाठ आणखी एक आशियाई संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला.