Breaking News

पक्षाचे 25 आमदार माझ्यासोबत

सचिन पायलट यांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षाच्या 25 आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जयपूरला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपमुख्यमंत्री पायलट म्हणाले की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांच्याजवळ 102 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे, पण तो पूर्णपणे चुकीचा आहे. 25 आमदार इथे माझ्यासोबत बसले आहेत. आम्ही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जयपूरला जाणार नाही.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या नाराजीमुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार अस्थिरतेच्या लाटेवर हेलकावे खाताना दिसत आहे. पायलट यांची मनधरणी सुरू असताना काँग्रेसच्या जयपूर येथील प्रदेश कार्यालयातून त्यांचे पोस्टर हटविण्यात आले आहेत. काँग्रेसमध्ये सातत्याने सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे या पक्षाला आपले नेतेही सांभाळता येत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
‘राहुल गांधी जबाबदार’
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांवरून भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राजस्थानमध्ये जे काही घडत आहे आणि मध्य प्रदेशात जे काही घडले, त्याला राहुल गांधी जबाबदार आहेत. ते तरुण नेतृत्वाला मोठे होऊ देत नाही. शिक्षित आणि क्षमता असलेले ज्योतिरादित्य शिंदे व सचिन पायलट यांच्यासारख्या नेत्यांना उच्च पद मिळाली, तर राहुल हे मागे पडतील, असे त्यांना वाटत असल्याचा आरोप भारती यांनी केला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply