ठाणे : प्रतिनिधी
साहित्यसंपदा समूहातर्फे ठाणे येथील नवजीवन विद्या मंदिर येथे साहित्य संस्कार शिबिर घेण्यात आले. मराठी भाषेवर होणारे आक्रमण आणि लोप पावणारी वाचन संस्कृती असे ज्वलंत मुद्दे सर्वत्र चर्चेत असताना साहित्यसंपदा समूहाने त्यावर ठोस पाऊल उचलत साहित्य क्षेत्रात आपले भरीव योगदान साहित्य संस्कार शिबिरांतर्गत देण्यास सुरुवात केली.
या शिबिराला शाळेचे संस्थापक जितेंद्र बजाज, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. समूहातील दिलीप मोकल लिखित ईशस्तवनाने शिबिराची सुरुवात करण्यात आली. शिबिरामध्ये समूह संस्थापक वैभव धनावडे, वैशाली कदम, संजय कदम, सुरेंद्र बालंखे, कविता बालंखे आणि प्रार्थना बालंखे, रवींद्र सोनावणे, सलोनी बोरकर, समूह प्रशासक नमिता जोशी, शारदा खेडकर यांनी विविध साहित्यिक विषयांवर शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी समूहातील कविता बालंखे, सुरेंद्र बालंखे, वैशाली कदम, संजय कदम यांनी शाळेसाठी आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न केला, तसेच काही भेटवस्तू शाळेला देण्यात आल्या. या शिबिराच्या नियोजनाची जबाबदारी मनोमय मीडियाने उत्तमरीत्या सांभाळली. शाळा संस्थापक जितेंद्र बजाज यांनी सर्वांचे आभार मानले.