Breaking News

उरणमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

बाजारपेठ बंद, रस्ते निर्मनुष्य, पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त

उरण : वार्ताहर
कोविड-19 विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी उरण तालुक्यात तीन दिवस लॉकडाऊन लागू झाला असून, आवश्यकतेनुसार त्याचा कालावधी वाढविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी (दि. 13) पहिल्याच दिवशी शुकशुकाट पहावयास मिळाला.
साथरोग अधिनियमन 1897च्या कलम 2 अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन 2005च्या सर्व संबंधित तरतुदींसह प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून आणि जिल्हाधिकार्‍यांच्या पूर्वमान्यतेने उपविभागीय अधिकारी यांनी संपूर्ण उरण तालुका कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूची साखळी तुटावी यासाठी 13 जुलै रोजी पहाटे 5 वाजल्यापासून ते 16 जुलैला रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार याचा कालावधी वाढविण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी जाहीर केले आहे, तर या कालावधीत नियमांच्या कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था यांच्यावर महामारी रोग अधिनियम 1897 आपती व्यवस्थापन अधिनियम 2005च्या अंतर्गत इतर संबंधित कायदे व नियमांच्या तरतुदीनुसार कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
उरण शहरात कडक लॉकडाऊन करण्यात आले असून, बाजारपेठ, भाजी मार्केट, मच्छी मार्केट, किराणा दुकाने आदी बंद ठेवण्यात आली. फक्त मेडिकल दुकाने सुरू असून, दूध विक्रीसाठी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे.
दुसरीकडे शहरात पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कामाशिवाय विनाकारण फिरणार्‍यांवर तसेच बाईकवर डबल सीट जाणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे; अन्यथा कारवाई केली जाईल, असे उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply