माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव तालुक्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून आजतागायत 40 गावांतून 203 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 146 रुग्ण स्वतःच्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर पूर्णपणे बरे होऊन घरी परतले असून दोघांचा मृत्यू झाला. सध्या तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 55 असल्याची माहिती रायगड जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
माणगाव तालुक्यातील मोर्बा, माणगाव, इंदापूर या ठिकाणी लॉकडाऊनच्या सहाव्या टप्प्यात सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. मोर्बा गावात वयस्कर मंडळी जास्त आढळत आहेत. माणगाव नगरपंचायत हद्दीत सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जेवढे रुग्ण बरे होत आहेत तेवढेच पुन्हा वाढत असल्याने बाधितांचा आकडा कमी होत नाही. एखाद्या दिवसात पाच-सहा रुग्ण बरे झाले तर पुन्हा लगेचच तितकीच किंवा त्याहून अधिक वाढ होत आहे. तालुका प्रशासनाने यासाठी सर्व नागरिकांना काळजी घेण्याची सूचना केली आहे. तालुक्यातील जनतेने कोरोनाच्या संकटात खबरदारी घेऊन स्वतःसह आपल्या कुटुंबाची व समाजाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी केले आहे.