पेण ः प्रतिनिधी
पेण तालुक्यात 450हून अधिक गणेशमूर्ती कार्यशाळा आहेत. त्यातून दरवर्षी लाखो गणेशमूर्ती तयार केल्या जातात. आकर्षक रंगसंगती आणि सुबकतेमुळे देश-विदेशातून येथील मूर्तींना मोठी मागणी असते, पण यंदा या व्यवसायावर कोरोना आणि टाळेबंदीचे सावट असल्याने गणेशमूर्तींच्या मागणीत मोठी घट झालेली दिसून येत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच लांबलेल्या टाळेबंदीमुळे पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायावर मंदीचे सावट आहे. परिणामी दरवर्षीच्या तुलनेत 40 ते 50 टक्केच गणेशमूर्ती विविध भागांत रवाना झाल्या आहेत.
यंदा गणेशमूर्तींच्या परदेशवारीत अडचणी निर्माण झाल्या आहेत. निर्जंतुक करून जवळपास 15 ते 20 हजार गणेशमूर्तीच परदेशात रवाना झाल्या आहेत. देशांतर्गत मागणीतही मोठी घट झाली आहे. यंदा मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील व्यापारी-विक्रेते पेणकडे फारसे आले नाहीत.