Breaking News

लॉकडाऊन : रायगडात 65 जणांची आत्महत्या

अलिबाग : प्रतिनिधी

कोरोनाची महामारी आणि त्यामुळे लागू झालेल्या टाळेबंदी (लॉकडाऊन)चे आता आर्थिक आणि सामाजिक परिणाम दिसून येत आहेत. त्याचबरोबर या परिस्थितीचे मानसिक दुष्परिणामही दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत 65 जणांनी आत्महत्या केली आहे, तर मानसिक ताणतणाव आणि नैराश्याचे प्रमाणही वाढले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. चार महिन्यांनंतरही तो पूर्णपणे उठू शकला नाही. या लॉकडाऊनचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम सर्वत्र दिसून येत आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रांना लॉकडाऊनची झळ पोहचली आहे. बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे. घरखर्च कसा चालवायचा, अशी विवंचना अनेकांना भेडसावू लागली आहे. त्यामुळे मानसिक ताणतणाव आणि नैराश्य वाढण्यास सुरुवात झाली आहे. यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे.

रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत गेल्या चार महिन्यांत 65 आत्महत्यांची नोंद झाली. यात मार्चमध्ये 15, एप्रिलमध्ये 11, मेमध्ये 24 आणि जूनमधील 15 आत्महत्यांचा समावेश आहे. या आत्महत्यांमागची कारणे वेगवेगळी असली तरी त्याला लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची किनार आहे. समाजातील वाढते मानसिक ताणतणाव व नैराश्याचे हे द्योतक आहे. राज्य सरकारने याचे गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजना करावी,

अशी मागणी होत आहे.

कोरोनामुळे भीतीचे वातावरण

कोरोनामुळे समाजात एक नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. परिणामी मानसिक तणाव वाढत आहे. कोरोना झालेले आणि न झालेले लोकदेखील भीतीच्या छायेत आहेत, मात्र कोरोनाची भीती न बाळगता त्याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे. 96 टक्के रुग्ण या आजारातून बरे होत आहेत हे समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.

कुटुंबीयांनी साथ देणे गरजेचे

मानसिक आजारांचे वेगवेगळे प्रकार असतात. अशा परिस्थितीत ताण-तणावांचे योग्य व्यवस्थापन करणे, सकारात्मक जीवनशैली आत्मसात करणे, गरज भासल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला आणि उपचार घेणे गरजेचे आहे. मानसिक त्रास होत असलेल्या व्यक्तीवर घरातल्यांनी लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचाही मानसोपचारतज्ज्ञांचा आग्रह आहे. अनेकदा कुटुंबीयांनी दिलेली साथ मोलाची ठरल्याची उदाहरणे आहेत.

सध्याच्या एकूण परिस्थितीमुळे मानसिक ताण-तणाव आणि नैराश्य वाढत आहे. त्यामुळे लोकांनी सकारात्मक जीवनशैली आत्मसात करायला हवी. तणावमुक्त राहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

-डॉ. अमोल भुसारे, मानसोपचारतज्ज्ञ

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply