आरोग्य प्रहर
थंडीच्या दिवसांत भूक वाढून पचनशक्तीही सुधारते. हवेतील बदलामुळे सर्दी-खोकलाही होऊ शकतो. एकीकडे सकाळी अंथरुणातून बाहेर पडायला जिवावर येते, तर दुसरीकडे व्यायाम करायला उत्साहही वाटतो. तापमान घसरल्यावर आपल्याला भूक लागते व काही खाल्ले की शरीरात ऊर्जा तयार होऊन आपल्याला बरे वाटते. या मोसमात आहाराबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे.
थंडीत स्वेटर घालून का होईना, पण बाहेर पडा व मस्त व्यायाम करा. अशावेळी पोटातील भूक आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. मग सटर-फटर खाल्ले जाते व उलट वजन वाढते. थंडीच्या दिवसांत समतोल आहार राखला पाहिजे.
* व्यायामाला वेळ राखून ठेवा. कंटाळा झटकून व्यायाम केल्यास शरीरातून घाम निघून मस्त वाटेल.
* काहीवेळ उन्हात बाहेर पडा. आपल्याला सूर्यामुळे ‘ड’ जीवनसत्त्व मिळते.
* थंडीच्या दिवसांत भरपूर फळे, भाज्यांचे घरी केलेले गरमागरम सूप, वेगवेगळी सलाड्स करून खायला हरकत नाही.
* हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी पडू लागते आणि सुरकुत्या वाढू शकतात. पाणीदेखील कमी प्यायले जाते. त्यामुळे आवर्जून पाणी प्या आणि त्याचबरोबर गरम सूप, ग्रीन टीसारखे पदार्थदेखील घ्या.
* आपल्याकडे थंडीतील सणांत तिळाचे लाडू, गूळपोळी खाण्याची पद्धत आहे. तसेच बाजरी, हुरडा आणि काही ठिकाणी मक्याची रोटी खायचीही पद्धत आहे. हे पदार्थ जास्त कार्बोदके देणारे असल्याने शरीरातील ऊर्जा वाढवितात आणि पचतातदेखील. तिळामुळे ऊर्जा आणि कॅल्शियमही मिळते.
* बदाम, खारीक, डिंकाचे लाडू असे पदार्थ या मोसमात केले आणि खाल्ले जातात. ते प्रमाणातच खा.
* सकाळच्या चहात तुळशीची पाने आणि आले टाकल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी खोकलाही लांब राहतो.
* थंडीत थोडे मसालेदार खावेसे वाटते. मिरी, मिरच्या, आले, लसूण आणि दालचिनीसारखे पदार्थ शरीराला उष्णता देतात. त्यात फायटो केमिकल्स असल्याने ते शरीराचे आजारापासून रक्षणदेखील करतात.
* या मोसमातील संत्री, आवळे भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व देतात. प्रतिकारशक्ती वाढवतात आणि त्वचा, केसांचे आरोग्यही चांगले ठेवतात.