Breaking News

पनवेल मनपाच्या नावाने खोटे व्हिडीओ, मेसेज फॉरवर्ड करणार्‍यांवर होणार कारवाई

पनवेल ः प्रतिनिधी, बातमीदार

पनवेल महानगरपालिकेच्या नावाने संबंध नसलेले व्हिडीओ प्रसारित करून अनेकांना तसे करण्यास अप्रत्यक्षपणे सोशल मीडीयातून उत्तेजित केले जात आहे. त्यामुळे कोरोनासारख्या आंतरराष्ट्रीय आपत्तीत लोकांत गैरसमज व खोट्या गोष्टी पसरविण्यात येत आहेत. अशा खोट्या व तथ्यहीन गोष्टी सोशल मीडियातून पसरविणार्‍या व्यक्तींना साथरोग अधिनियम 1897 अंतर्गत व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत तसेच भारतीय दंडसंहिता कलम 188 अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

कोरोनासारख्या जागतिक महामारीत मार्च महिन्यापासून आजअखेर चार महिने सुटी न घेता सर्व अधिकारी-कर्मचारी नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अतिशय तुटपुंजा मनुष्यबळावर सातत्याने तेच ते काम करीत आहेत. कोणतीही वैद्यकीय पार्श्वभूमी नसताना व तशी साधनसामुग्री नसताना अचानक घडलेल्या घटनांमुळे प्रशासन रात्रीचा दिवस करून मेहनत घेत आहे. त्यामुळे अन्य मोठ्या शहरांपेक्षा पनवेलची परिस्थिती बरीच चांगली आहे.

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील मनपाचे अधिकारी-कर्मचारी कर्तव्यावर आहेत. 35पेक्षा जास्त कर्मचार्‍यांना कोरोनाचा संसर्ग होऊनही प्रशासनाने कोरोनाविषयक कोणतेही काम बंद पडू दिले नाही.

अशा वेळी काही व्यक्तींच्या दुष्कृत्याचा दोष महानगरपालिकेच्या माथी मारून महानगरपालिकेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंध नसलेले व्हिडीओ पनवेल महानगरपालिकेच्या नावाने प्रसारित करून अनेकांना तसे करण्यास अप्रत्यक्षपणे सोशल मीडियातून उत्तेजित केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अथक प्रयत्नांना अडथळा निर्माण होत आहे. अनेक कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून लोकहितासाठी काम करीत असताना त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी खोट्या गोष्टींपायी अवहेलना सहन करावी लागत आहे. त्यामुळे खोट्या व तथ्यहीन गोष्टी सोशल मीडियातून पसरविणार्‍या व्यक्तींना कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देणे प्रशासनाला इच्छा नसताना भाग पडत आहे.

अशा लोकांवर साथरोग अधिनियम 1897 अंतर्गत व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत तसेच भारतीय दंडसंहिता कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात येऊ शकते. आपल्या परिचित व्यक्तींना सोशल मीडियात जर खोटे, बदनामी करणारे व अफवा पसरविणारे मेसेज व व्हिडीओ फॉरवर्ड करीत असतील तर अ‍ॅडमिनसह संबंधित व्यक्तींवर सायबर गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्यात येईल याची कल्पना द्यावी. कोणी असा अपप्रचार व खोटे मेसेज करीत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी किंवा पनवेल महानगरपालिकेला कळविण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Check Also

विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करून जनतेची …

Leave a Reply