उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील रानमाळात पूर्वी ठिकठिकाणी पावसाळ्यात आढळणारी टाकळा ही वनस्पती औषधी गुणांनी परिपूर्ण अशी रानभाजी म्हणून ओळखली जाते. ही नैसर्गिक रित्या उगवलेली रानभाजी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे उरण तालुक्यातील वशेणी येथील इतिहास संपादकीय मंडळाच्या निरिक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे टाकळा या भाजीचे संवर्धन करण्यासाठी वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने टाकळा संवर्धन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी टाकला संवर्धन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या अभिनव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतीही फी किंवा वयाची अट नाही. या स्पर्धेत संपूर्ण उरण तालुका, पेण तालुक्यातील फक्त दादर, उर्णोली, सोनखार, रावे, खारपाडा, दूरशेत, बळवली, कळवा, ही गावे तर पनवेल तालुक्यातील फक्त केळवणे, साई, कासारभट, दिघाटी या गावांतील नागरिकांना स्पर्धत भाग घेता येईल. तर एकूण 11 विजेत्यांना पुरस्कार, रोख रक्कम, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल. त्याचबरोबर सहभागी सर्वांनाच प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्र म्हात्रे यांनी सांगितले आहे.
या स्पर्धेत सहभागी होणार्या स्पर्धकाने आपल्या आजूबाजूला, डोंगरात, माळरानात कुठे ना कुठेतरी उगवलेली टाकळ्याची रोपे शोधायची आहेत. हीरोपे व्यवस्थित काढून ती त्यांने एखाद्या कुंडीत लावावी, एखादा वाफा तयार करुन त्यात लावावी. किंवा आपल्या परसात, गॅलरीत एखादा कोपरा तयार करुन त्यात लावावी. त्यानंतर लावलेल्या टाकळ्याच्या रोपाचा फोटो, किंवा केलेल्या टाकळा बागेचा, कुंड्यांचा फोटो टाकळा संवर्धन समुहावर किंवा मोबाइल 9819652951या व्हॉट्सअॅपवर क्रमांकावर पाठवावा.
यानंतर स्पर्धकाने लावलेल्या टाकळ्याच्या रोपाला साधारण दिवाळीमध्ये शेंगा येतील. या शेंगा परिपक्व होण्याच्या काळात परिक्षण केले जाईल. तो पर्यत आपले रोपटे, आपली टाकळ्याची बाग जपून ठेवावी लागणार असल्याचे आयोजकांनी शेवटी स्पष्ट केले आहे.