पनवेल ः रामप्रहर वृत्त – पनवेल रेल्वेस्थानकालगत व निवासी इमारतींच्या परिसरात पनवेल महापालिकेमार्फत तयार केलेले डम्पिंग ग्राऊंड आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने हे डम्पिंग ग्राऊंड लवकरात लवकर बंद करून दुसरीकडे हलवावे, अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या डम्पिंग ग्राऊंडची शनिवारी (दि. 5) महापालिकेच्या अधिकार्यांसह पाहणी केली.
या संदर्भात पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच या निवेदनाची प्रत भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांनाही माहितीसाठी पाठविण्यात आली आहे. त्यानुसार सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल महापालिकेच्या अधिकार्यांसह या डम्पिंग ग्राऊंडची पाहणी करून परिस्थितीचा आढवा घेतला.
या वेळी पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक तेजस कांडपिळे, नगरसेविका चारुशीला घरत, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, बांधकाम व शहर अभियंता संजय कटेकर, सुधीर साळुंखे, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड आदी उपस्थित होते.