Breaking News

माणगावमधील वादळग्रस्तांना नुकसानभरपाई केव्हा मिळणार?

ज्ञानदेव पवारांचा महाआघाडी सरकारला घरचा आहेर

माणगाव : प्रतिनिधी
माणगाव तालुक्यातील वादळग्रस्तांना राज्य सरकारकडून नुकसानभरपाई केव्हा मिळणार, असा सवाल काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार यांनी उपस्थित केला आहे. यानिमित्ताने त्यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ज्ञानदेव पवार यांनी म्हटले आहे की, 3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोकणातील रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना बसला. या वादळात अनेकांची घरे पडून मोठे नुकसान झाले तसेच बागायतदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे वादळ झाल्यावर मंत्री, आमदार, खासदार यांसारख्या अनेक लोकप्रतिनिधींनी नुकसानग्रस्त गावांचा पाहणी दौरा करून तातडीने पंचनामे करण्यात येऊन लवकरात लवकर शासकीय मदत मिळेल, असे आश्वासित करण्यात आले होते, मात्र वादळ होऊन दीड महिन्यांहून अधिक काळ झाला असून, अद्याप प्रशासन पंचनाम्याचीच तपासणी करीत आहेत. माणगाव तालुक्यातील अनेक नुकसानग्रस्तांना अजूनपर्यंत नुकसानभरपाई मिळालेली नाही. तहसील कार्यालयात हेलपाटे मारून नुकसानग्रस्त दमले आहेत.
तहसीलमधून सांगण्यात येते की नुकसानग्रस्तांची नावे व त्यांच्या मदतीची रक्कम आम्ही बँकेकडे पाठविली आहे. बँकवाले सांगतात तहसीलमधून आमच्याकडे काही आलेले नाही. ज्यांची कोणाची नावे व रक्कम जमा केली आहे त्यांच्या खात्यावर आम्ही रक्कम जमा केली आहे. प्रत्यक्षात तहसील व बँकवाले यांच्यात कोणताच ताळमेळ नसून ही सारी मंडळी नुकसानग्रस्तांना आणखी त्रास देत आहेत. सध्या जनता गेल्या चार महिन्यांपासून कोरोना महामारीने हैराण झाली आहे. त्यात बसलेल्या चक्रीवादळाच्या फटक्यामुळे बिकट अवस्था झाली असून, या परिस्थितीत जनतेला लवकरात लवकर सावरण्याचे काम सरकारने करणे आवश्यक होते, मात्र सरकारने नुकसानग्रस्तांच्या तोंडाला पानेच पुसली असल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply