बेलोशीकरांचा समाजापुढे आदर्श
अलिबाग : प्रतिनिधी
कोरोनामुळे पतीचे निधन, पत्नी आणि मुलगाही पॉझिटिव्ह… एकीकडे पती गेल्याचे दुःख दुसरीकडे भातशेती कशी लावायची हा यक्षप्रश्न… अशी दुःखद व कठीण परिस्थिती अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथील एका कुटूंबावर ओढवली होती…, परंतु ग्रामस्थांनी सामाजिक भान राखून एकत्रित येत त्यांची भातलावणी पूर्ण करून दिली. कोरोना काळात रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांनी बहिष्कृतासारखी वागणूक दिली जात असताना बेलोशी ग्रामस्थांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
अलिबाग तालुक्यातील बेलोशी गावचे दिनानाथ ठाकरे यांचा 9 जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. कोरोनाची लक्षणे असल्याने रुग्णालयानेच त्यांचे शव दहन केले. दोन दिवसांनी ठाकरे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्या पत्नी आणि मुलालाही कोरोनाची लागण झाल्याने दोघेही घरातच क्वारंटाइन होते. भातलावणीचे दिवस असल्याने आणि त्यातच कोरोनाची लागण झाल्याने आता शेत कसे लावायचे हा प्रश्न ठाकरे माय-लेकाला पडला होता. ठाकरे कुटूंबावर आलेल्या या संकटात बेलोशी ग्रामस्थ पूर्णपणे पाठीशी उभे राहिले आणि त्यांच्या दोन एकर भातशेतीत गावकर्यांनी एकत्रित येऊन लावणी पूर्ण केली.
कोरोना महामारीत माणुसकी विरळ होत चालली आहे. कोरोना लागण झालेल्याबरोबर दुजाभाव केला जात असतो. कोरोनातून बरे झाले असले तरी त्याच्याकडे संशयाने पाहिले जाते. याउलट बेलोशी ग्रामस्थांनी एक सकारात्मक पाऊल टाकत ठाकरे कुटूंबाला कोरोना काळात आधार दिला. गावकर्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.