Breaking News

काँग्रेसला धक्का : आणखी एका राज्यातील सरकार कोसळले

पुद्दुचेरीत मुख्यमंत्री नारायणसामी यांचा राजीनामा

पुद्दुचेरी : वृत्तसंस्था
केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, काँग्रेस आघाडीचे सरकार कोसळले आहे. विधानसभेत या सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. त्यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी नायब राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.
पुद्दुचेरीत रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारूढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर नारायणसामी यांचे सरकार संकटात आले होते. त्यामुळे सोमवारी (दि. 22) सरकारला बहुमत सिद्ध करावे लागले, मात्र सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. विशेष म्हणजे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नुकताच पुद्दुचेरीचा दौरा केला होता. या वेळी त्यांनी एका कार्यक्रमाला उपस्थितीदेखील लावली होती.
काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एका आमदाराच्या राजीनाम्याने 33 सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारूढ काँग्रेस आघाडीचे संख्याबळ 11पर्यंत घसरले होते. विरोधी आघाडीकडे 14 सदस्य, तर सात जागा रिक्त आहेत. यामुळे नारायणसामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती, मात्र विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध न करता आल्याने काँग्रेस आघाडीचे सरकार कोसळले आहे.
नारायणसामी सरकारचा 11 विरुद्ध 11 अशा मतांनी पराभव झाला. बहुमत ठराव सादर करण्यासाठी एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले होते. अधिवेशन सुरू होताच नारायणसामी यांनी बहुमतासाठी प्रस्ताव मांडला होता, पण काही वेळातच त्यांच्यासह सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला. यानंतर अध्यक्षांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचे जाहीर केले. दरम्यान, मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सोपवल्याचे वृत्त आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply