मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे एक कुटुंबाप्रमाणे असल्याचे दाखवले जाते, पण एकमेकांशी सुसंवाद नसलेले हे सरकार म्हणजे कुटुंब नसून लिव्ह इन रिलेशनशिप आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, मी इतिहासाचा अभ्यासक आहे. अशा प्रकारचे सरकार कधीच चालेले नाही. या सरकारमध्ये काँग्रेस आहे आणि काँग्रेस हे सरकार चालू देणार नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात काहीही म्हणोत, पण काँग्रेसनेही असे सरकार कधीच चालू दिलेले नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमधील हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल.
राज्यात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे सरकारला दोन आघाड्यांवर लढावे लागणार आहे. कोरोनाशी सामना करतानाच राज्य सरकारला अर्थव्यवस्थाही रुळावर आणावी लागेल. त्याकरिता धाडसी निर्णय घेतले पाहिजे. नाही तर आगामी काळात उद्योग आणि सेवा क्षेत्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो. हातपाय गाळून बसणे राज्याला परवडणार नाही. राज्याचे अर्थचक्र गतिमान करण्यासाठी काही कमिट्या स्थापन केल्या होत्या. या समित्यांनी अहवाल दिला आहे. त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. अहवाल आलेत व तसेच पडून राहणार असतील तर ते योग्य ठरणार नाही, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.
राज्यातील छोट्या व्यावसायिकांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत प्रत्येकाला आर्थिक झळ बसली आहे. त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने विशेष प्लानिंग केले पाहिजे. शेतीचेही नियोजन केले पाहिजे. छोट्या घटकांना पुढे नेण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी विशेष भर दिला पाहिजे. हे नियोजन केले तरच कोरोनानंतरच्या काळात वेगाने झेप घेणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.
एकही पत्राला उत्तर मिळालेले नाही!
विरोधाला विरोध मी आजपर्यंत कधीही केलेला नाही. शक्य तितके सहकार्य मी करतोय, मात्र ठाकरे सरकारकडून अद्यापपर्यंत एकाही पत्राला उत्तर मिळालेले नाही. नायर रुग्णालयातील रुग्णसंख्या दडवल्याचा प्रकार मी उघडकीस आणून मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे तसे लक्षात आणून दिले होते. त्यावर त्यांनी मला फोन करून चर्चा केली. हा अपवाद वगळता त्यांनी कधीच माझ्या पत्रांना उत्तर दिले नाही, अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. माझ्या पत्रांना उत्तर मिळाले नाही, पण मी पाठवलेल्या पत्रांनंतर सरकारकडून काही निर्णय झाल्याचे दिसले, असेही ते म्हणाले.