उरण ः वार्ताहर, प्रतिनिधी
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) कोविड-19 महामारीच्या काळातही राष्ट्रनिर्मितीत महत्त्वाच्या योगदानकर्त्याची आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने जुलै महिन्यात 344,316 टीईयू कंटेनरची हाताळणी केली आहे, जी जूनच्या तुलनेत 19 टक्के जास्त आहे. जेएनपीटीने जुलै महिन्यात एकूण 196 जहाजांची हाताळणी केली असून एकूण 4.85 दशलक्ष टन वाहतुकीची हाताळणी केली, जी जूनमधील 4.07 दशलक्ष टनांच्या तुलनेत 19 टक्क्यांनी जास्त आहे.
जेएनपीटी हे बंदर आधारित विशेष आर्थिक क्षेत्र जेएनपीटी सेझ विकसित करणारे भारतातील पहिले बंदर बनले आहे. या बहुउत्पादन बंदर आधारित सेझचे उद्दिष्ट नौवहन मंत्रालयाच्या सागरमाला उपक्रमांतर्गत बंदर आधारित औद्योगीकरण सक्षम करून निर्यातीला चालना देणे आहे. यामध्ये पाच कंपन्यांनी त्यांचे बांधकाम कार्यही सुरू केले असून त्यापैकी दोन कंपन्यांनी सेझमध्ये अलीकडेच यशस्वीरीत्या आपले कार्य सुरू केले. सर्व तीन कंपन्यांना विकास आयुक्त, सिप्झ (एसईपीझेड), सेझ यांनी कार्य सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या सेझमधील कंपन्यांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी जेएनपीटी वचनबद्ध आहे.
जेएनपीटी सेझचे कार्य सुरू होण्याबरोबरच एक महत्त्वाची घटना म्हणजे डीपी वर्ल्ड व एनआयआयएफ यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या हिंदुस्तान इन्फ्रालॉग प्रायव्हेट लिमिटेडने (एचआयपीएल) जेएनपीटीमध्ये न्हावा शेवा बिझनेस पार्क (एनएसबीपी), फ्री ट्रेड वेयरहाऊसिंग झोन विकसित करण्यासाठी 1000 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. हा प्रकल्प 2021च्या अखेरीस पूर्ण होईल व जेएनपीटीमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारास विनाअडथळा व्यापार करता येईल. जेएनपीटीमधील फ्री ट्रेड वेयरहाऊसिंग झोन कार्यरत झाल्यानंतर भारत एक प्रमुख व्यापार आणि उत्पादन केंद्र म्हणून विकसित होईल व सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमास मदत होईल.
जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले की, जेएनपीटी देशाच्या आर्थिक विकासात यापुढेही योगदान देतच राहील व बंदर क्षेत्राच्या निरंतर विकासासाठी आपले कर्तव्य पार पाडेल. जुलैत निर्यातीत वाढ झाली आहे व या महिन्याच्या अखेरपर्यंत आयातही सामान्य होण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही महिन्यांत थोडेफार चढ-उतार झाले होते, परंतु आम्ही आमचे कार्य निरंतर सुरू ठेवण्यात यशस्वी झालो तसेच जेएनपीटी हे देशातील पहिले बंदर आहे जेथे बंदर आधारित आर्थिक क्षेत्र यशस्वीरीत्या विकसित होत आहे. आम्हाला विश्वास आहे की जेएनपीटी सेझमध्ये गुंतवणुकीसाठी अग्रगण्य जागतिक कंपन्या आकर्षित होतील.
जेएनपीटीने आपले कर्मचारी, जेएनपीटी प्रकल्पग्रस्त व स्थानिक समुदायासाठी जेएनपीटी हॉस्पिटलमध्ये एक समर्पित कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) सुरू केले आहे. यापूर्वी जूनमध्ये जेएनपीटीने आपले बहुकौशल प्रशिक्षण केंद्र स्थानिक समुदायासाठी कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित केले होते. या अभूतपूर्व परिस्थितीला तोंड देत असतानाही जेएनपीटी आपले कर्मचारी, भागधारक व स्थानिक समुदायासाठी जे आवश्यक आहे ते सर्व करण्यास प्रतिबद्ध आहे. जेएनपीटी यापुढेही नावीन्य, समर्पण, ग्राहक सेवा देण्यासाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपले स्थान आणखी मजबूत करण्यासाठी, लक्ष्य साध्य करण्यासाठी व आपले अग्रगण्य स्थान कायम ठेवण्यासाठी आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांचे पोर्ट ऑफ चॉईस म्हणून कायम राहण्यासाठी प्रयत्नशील राहील.