Breaking News

‘त्या’ कर्मचार्यांचे निलंबन अखेर मागे

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबाग आगारातील निलंबित 31 कर्मचार्‍यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या सर्व कर्मचार्‍यांचे निलंबन आता मागे घेण्यात येणार असून, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची ने-आण करण्यासाठी अलिबाग आगारातील कर्मचार्‍यांना अलिबाग ते दादर व दादर-पनवेल अशा मार्गावर ड्युटी लावण्यात आल्या होत्या, परंतु या मार्गावर काम करण्यास कर्मचार्‍यांनी नकार दिला होता. त्यामुळे अलिबाग आगारातील 15 चालक व 16 वाहकांवर 31 जुलै रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. विभाग नियंत्रकांनी केलेल्या या कारवाईमुळे कर्मचार्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते.

अलिबाग आगारातील कर्मचार्‍यांनी सोमवारी एकत्र येत या कारवाईबद्दल निषेध नोंदविला तसेच आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. हे निलंबन अन्यायकारक असून ते मागे घ्यावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली होती, परंतु प्रशासकीय पातळीवर कोणत्याच हालचाली होत नसल्याने कर्मचार्‍यांमधील असंतोष वाढत होता.

अखेर मंगळवारी (दि. 4) कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री आदिती तटकरे व अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासह मुंबईत परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेतली. या वेळी एसटी कामगार सेना अलिबाग युनिटचे अध्यक्ष दिलीप पालवणकर व सचिव प्रसन्ना पाटील यांनी हे निलंबन कसे अन्यायकारक आहे हे परिवहनमंत्र्यांना पटवून दिले. त्यानंतर मंत्री परब यांनी ही निलंबनाची कारवाई मागे घेण्याचे आदेश यंत्रणांना दिले. त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली असून, निलंबन उठवण्यात येत असल्याचे रायगड विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इन्व्हेस्टिचर सेरेमनी

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply