Breaking News

हैदराबादचा बंगळुरूवर विजय

अबूधाबी ः वृत्तसंस्था

हैदराबादने बंगळुरूचा 4 धावांनी पराभव केला. आयपीएल 2021 स्पर्धेत हैदराबादचा हा तिसरा विजय आहे. हैदराबादने बंगळुरूसमोर विजयासाठी 142 धावांचे आव्हान दिले होते, मात्र बंगळुरूने 6 गडी गमवून 137 धावाच केल्या. या पराभवामुळे टॉप 2मध्ये राहण्याचे बंगळुरूचे स्वप्न कठीण झाले आहे. बंगळुरूची सुरुवात अडखळत झाली. कर्णधार विराट कोहली पहिल्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. अवघ्या 5 धावा करून तो तंबूत परतला. त्यानंतर डॅन ख्रिश्चियनही कमाल करू शकला नाही. सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर केन विलियमसनने त्याचा झेल घेऊन तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर श्रीकर भारतही 12 धावा करू बाद झाला. मग चौथ्या गड्यासाठी देवदत्त पडिक्कल आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी डाव सावरला. ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक खेळी केली, मात्र मॅक्सवेल धावचीत झाल्याने सामन्याला कलाटणी मिळाली. त्यानंतर पडिक्कलही तंबूत परतला. त्याने 52 चेंडूत 41 धावा केल्या. या वेळी सामना बंगळुरूच्या पारड्यात असताना शाहबाज अहमद बाद झाला आणि संघावरील दडपण वाढले. एबी डिव्हिलियर्सलाही शेवटच्या षटकात संघाला विजय मिळवून देता आला नाही. तत्पूर्वी अभिषेक शर्माच्या रूपाने हैदराबादला पहिला धक्का बसला. 13 धावा करून अभिषेक शर्मा तंबूत परतला. या खेळीत एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. जेसन रॉय आणि केन विलियमसन यांनी दुसर्‍या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी केली. हैदराबादने 10 षटकांत 1 गडी बाद 76 धावांची खेळी केली. संघाच्या धावा 84 असताना केन विलियमसन बाद झाला. त्याने चार चौकारांनिशी 29 चेंडूंत 31 धावांची खेळी केली. विलियमनस बाद होताच घसरगुंडी सुरू झाली. प्रियम गर्ग 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर रॉय त्याच षटकात बाद झाल्याने धावगती मंदावली. मग मैदानात आलेला अब्दुल समादही साजेशी कामगिरी करू शकला नाही. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर तो पायचीत झाला. वृद्धिमान साहाही मैदानात तग धरू शकला नाही. तो 13 चेंडूंत 16 धावा करून बाद झाला. त्यानंतर शेवटच्या षटकात जेसन होल्डर बाद झाला. बंगळुरूकडून हर्षल पटेलने तीन गडी बाद केले. डॅन ख्रिश्चियनने दोन, तर जॉर्ज गार्टन आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक गडी बाद केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply