Breaking News

वाढदिवसाचे निमित्त आणि मल्टीबॅगर्स..!

बाजारात गुंतवणूक करण्यासाठी काहीतरी निमित्त हवं. वाढदिवस ही अत्यंत महत्वाची आणि जिव्हाळ्याची गोष्ट. अर्थातच वाढदिवस हे निमित्त असावं, संधी नाही. वाढदिवसाचे निमित्त आणि मल्टीबॅगर्स स्टॉक्स्, हे गणित कसे जुळते पाहूयात.

10 ऑगस्ट 2003, माझ्या एका क्लायंटच्या मुलीचा वाढदिवस आणि त्यासुमारास त्यांनी ठरवलं होतं की, बाळाच्या नावानं बाळासाठी लग्नाच्या दृष्टीनं बँकेत मुदतठेव करायची आणि त्याचवेळेस तेव्हापर्यंतचा सर्वांत मोठा बुक-बिल्डिंगद्वारे होणारा आयपीओ येत होता, नाव होतं ’मारुती उद्योग’. जून 2003 मध्ये भारत सरकारनं मारुती उद्योगमधील आपला 25% हिस्सा प्राथमिक समभाग विक्रीद्वारे विकायचं ठरवलं आणि 125 रुपये प्रति शेअर असा भाव ठरवला गेला.  त्यांना मी माझ्या सवयीप्रमाणं फुकटचा सल्ला देऊन मोकळा झालो होतो की, ’बँकेत एफडी करण्यापेक्षा 20 वर्षांसाठी या आयपीओद्वारे या कंपनीत गुंतवणूक करावी’. त्यांनी मला अनेक प्रश्न विचारले, चालेल का? किती वाढेल? नुकसान होणार नाही ना? आणि योगायोगानं त्याचवेळी त्यांच्याकडं मारुती कंपनीची अल्टो गाडी होती. मग मी त्यांना सहजच विचारलं की, तुमची नवीन अल्टो विकायचा काही विचार आहे का, तर त्यांनी मला मारुतीबाबतची अनेक कौतुकं सांगितली, जसे की चालवावयास सुकर, लो मेंटेनन्स, उत्तम मायलेज, भारतातील सर्वांत मोठी गाड्यांची विक्री असलेली कंपनी, कोठेही स्पेअरपार्ट मिळणारी एकमेव कंपनी, उत्तम सर्व्हिस, व्हॅल्यू फॉर मनी, इ. आणि तरीही त्यांनी या शेअर्समध्ये गुंतवणूक केली नाहीच. खरंच त्यावेळेस देशातील पॅसेंजर कारचा 50 टक्क्यांहून अधिक हिस्सा हा मारुतीकडं होता, तरीही लोक या कंपनीत गुंतवणूक करण्यास साशंक होते. त्यावेळेस एफडीचे दर हे 6 टक्के होते (पाच किंवा अधिक वर्षांसाठीची मुदतठेव) आणि मागील तेरा वर्षांत वाढून ते 9 टक्क्यांवर गेलेले होते, त्यामुळं 2003 साली त्या गृहस्थांनी केलेली एफडी सरासरी 7.5% दसादशे दर गृहीत धरल्यास सध्या केवळ रु. 2.65 लाख रक्कम उभी राहू शकेल. मात्र हीच गुंतवणूक मारुतीच्या शेअर्समध्ये केली असती तर त्यांना आयपीओमध्ये 800 शेअर्स मिळाले असते व आज त्यांची किंमत तब्बल रु. 53.43 लाख असली असती. त्याच सुमारास जर कोणी अल्टो घेण्याऐवजी तेच 3.5 लाख रुपयांचे 2800 शेअर्स घेतले असते तर आज त्यांच्या बदल्यात एक आलिशान फ्लॅट व बीएमडब्ल्यू गाडी आली असती. (आजचा भाव 6679 गृहीत धरून). हाच भाव आतापर्यंत सर्वोच्च म्हणजे 9996 या स्तरावर जाऊन आला आहे हे विसरून चालणार नाही. अगदी मारुतीवर विश्वास जरी नसता तरी ज्या एचडीएफसी बँकेत तेव्हा एफडी केली, त्याच बँकेच्या शेअर्समध्ये जरी गुंतवणूक केली असती तरी त्या एक लाखाचे आज 38.60 लाख रुपये झाले असते. अशी कित्येक उदाहरणं देता येतील.

अजून एक उदाहरण, सप्टेंबर 2010 ची गोष्ट असेल, नोकरी सोडून स्वतःचा गुंतवणूक व्यवसाय सुरु करण्याचं निश्चित झालं होतं आणि त्यानुसार चांगल्या कंपन्या शोधण्यासाठी अभ्यास चालू केलेला होता आणि अशातच मला एक कंपनी चांगली वाटली, परंतु ती कंपनी ज्या क्षेत्रात होती, त्यामध्ये त्या कंपनीचा बाजारातील हिस्सा अगदीच कमी आढळत होता आणि त्यामानानं शेअरचा भाव मोठा वाटत होता आणि त्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीच्या शेअरच्या भावापेक्षा सुमारे सहापट होता. त्यामुळं आपसूकच त्या कंपनीकडं दुर्लक्ष झालं आणि एक सुवर्ण संधी हुकली. तेव्हा, रॉयल एन्फिल्ड ही कंपनी आयशर मोटर्सचीच उपकंपनी आहे हे माहीत नसल्यानं ही संधी हुकली. रॉयल एन्फिल्ड म्हणजे बुलेट बनवणारी कंपनी भारतीय असून 1994 मध्ये आयशर कंपनीमध्ये विलीन झाली. आपण सर्वच जण जाणतो की, मागील दहा वर्षात सर्वांत लोकप्रिय बाईक कोणती ठरली आहे?  त्यामुळं, 2010 मध्ये 1300 रुपयांवर असलेला आयशर मोटर्सचा शेअर त्या क्षेत्रातील अग्रगण्य टाटामोटर्सच्या 220 रु. भावाच्या सहापट होता. आज टाटामोटर्सच्या एका शेअरचा भाव 100 रुपयांनी घसरून 120 रुपये आहे तर आयशर मोटर्सच्या एका शेअरचा भाव 1300 वरून 21800 पोहचला आहे.    

असेच 2011 मध्ये माझ्या एका क्लायंटनं त्यांच्या मुलाला माझ्याकडं ट्रेनिंगसाठी पाठवलं. एकूणच त्या मुलाशी रोज वार्तालाप करताना ’बडे बाप का बेटा’ असा काहीसा तो प्रकार होता हे कळून चुकलं आणि त्याला मी त्याच्याच भाषेत धडे द्यायचं ठरवलं. हा मुलगा प्रति सप्ताह 4 ते 5 हजार केवळ स्कॉच पार्ट्यांवर खर्चत असे, म्हणजे महिन्याकाठी 16 ते 20 हजार. म्हणून मी त्याला त्या रकमेच्या निम्मी रक्कम त्याच व्यवसायातील कंपन्यांमध्ये गुंतविण्यास सांगितलं, अर्थातच ती गुंतवणूक त्याचे वडीलच करणार असल्यानं मी निर्धास्त होतो. तर शेवटी कंपन्या ठरल्या, युनायटेड स्पिरिट्स म्हणजे मॅकडॉवेल, बियरमधील नामवंत कंपनी व दुसरी कंपनी म्हणजे ’असोसिएटेड अल्कोहोल अँड बृअरीज’ ज्या कंपनीकडं अनेक मोठ्या ब्रँड्सची म्हणजे ब्लॅक डॉग, व्हॅट69, ब्लॅक अँड व्हाईट,इ. ची भारतामधील फ्रँचाईझ होती. तेव्हा या कंपन्यांच्या शेअर्सचा भाव अनुक्रमे, रु. 800 व 13 रुपये (अडजस्टेड भाव). आज युनायटेड स्पिरिट्सच्या शेअर्सचा भाव आहे, रु. 587 तर असोसिएटेड अल्कोहोल अँड बृअरीजच्या शेअर्सचा भाव आहे रु.265. म्हणजेच, त्या मुलाचे पार्ट्यांमध्ये उडवलेले पैसे अशा मार्गानं गुंतवणुकीतून भरून निघाले, असो.

तेव्हाचे काहीपेनी स्टॉक्स् आता मल्टिबॅगर्स होऊन लार्जकॅप/ब्लूचिप झालेले देखील पाहायला मिळतात. शब्दशः ज्या शेअरच्या किंमती एका वर्षात दुप्पट होतात आणि आरंभिक गुंतवणूकीचे मूल्य ज्या कंपनीनं अनेकपट केलंय त्या शेअरला मल्टीबॅगर शेअर म्हटलं जातं. आता प्रश्न आहे की, असे मल्टीबॅगर्स शेअर्स शोधायचे कसे ? ते आपण पुढे पाहूच.

* सुपरशेअर – येसबँक

मागील आठवड्यात सुपर शेअर्स म्हणून नमूद केलेल्यांपैकी डिविज लॅबचा शेअर या आठवड्यात देखील 7 टक्क्यांनी वाढला. परंतु या आठवड्यातील सुपरशेअर ठरला ’येसबँक’. फॉलो ऑन ऑफर (एफपीओ) संपल्यानंतर 11.1 रुपयांवरून वधारून या बँकेचा शेअर मागील आठवड्यात 14.1 रुपयांवर बंद झाला. या शेअरमध्ये 175.25 कोटी शेअरचे व्यवहार गेल्या आठवड्यात झाले. मूडी या क्रेडिट रेटिंग्स व वित्त संशोधन सेवा पुरावणार्‍या अमेरिकन कंपनीनं येसबँकेचा श्रेणी सुधार (अपग्रेड) केल्यानं देखील या बँकेच्या शेअर्समध्ये तेजी आली. परकीय चलन व्यवहारांच्या बाबतीबरोबरच दीर्घ मुदतीच्या परकीय व अंतर्गत चलन ठेव त्यांसाठी देखील सीएएए 1 वरून बी 3 सुधार केल्यानं हा शेअर आठवडाभर तेजीत राहिला. त्याच जोडीनं मागील आठवड्यात भारतीय आयुर्विमा महामंडळानं (एलआयसी) देखील येस बँकेत आपला हिस्सा 0.75 टक्क्यांवरून 4.98 टक्क्यांपर्यंत वाढवला, आता एलआयसीकडं येस बँकेचे 125 कोटी शेअर्स आहेत. याआधीच स्टेट बँक या भारतातील सर्वांत मोठं जाळं असणार्‍या बँकेनं येस बँकेत 6050 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 48.21% हिस्सा खरेदी केलेलाच आहे तर एचडीएफसीनं  देखील 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 7.97% हिस्सेदारी ठेवलीय. हे पाहता, जोखीम पत्करणार्‍यांसाठी दीर्घ मुदतीकरीता असा पेनी स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं हितावह ठरू शकतं.  

* पत धोरण बाजाराला पसंत

मागील आठवड्यात सोमवारी बाजार काहीसा नरम उघडला आणि सोमवारचा दिवस लाल ठरला. परंतु नंतर दररोज बाजार ऊर्ध्व दिशेस जात राहिला व आठवड्याच्या शेवटास निफ्टीनं 1.27 टक्क्यांची तेजी तर सेन्सेक्सनं 434 अंशांची वाढ नोंदवली. मागील आठवड्यातील गुरुवारी रिझर्व्ह बँकेनं आपलं धोरण जाहीर केलं, ज्यामध्ये व्याजदर जैसे थे ठेवले गेले. त्यामुळं बँकांमधून पैसा बाहेर न गेल्यास तरलता वाढेल व त्याचा फायदा बँकांना आणि पर्यायानं ग्राहक वर्गाला होईल या अपेक्षेनं आणि मोरोटोरियमची सवलत अजून न वाढवता ती ठरल्याप्रमाणं ऑगस्ट अखेरीस संपेल यावर शिक्कामोर्तब झाल्यानं व लोनवरील एकवेळ पुनर्रचना करणार असल्याचं जाहीर आल्यानं बँकांचे शेअर्स घसरले नाहीत. 10 हजार कोटी रक्कम ही नाबार्ड व नॅशनल हाऊसिंग बँक यांना देण्याचं ठरल्यानं मागे उल्लेख केल्याप्रमाणं ग्रामीण भारतावर भर देणार्‍या कंपन्यांचे शेअर्स यापुढं देखील तेजीत राहतील असं वाटतं. सोनं तारण करताना मूल्याच्या 75% ऐवजी आता 90% कर्ज देण्यास परवानगी दिली गेल्यानं सोन्याच्या भावात तेजीच राहील असा कयास करता येऊ शकतो. सोनं या आठवड्यात देखील पुढं गेलं असलं तरी आता नफेखोरी संभावते. मागील लेखात सांगितल्याप्रमाणं निफ्टीनं 10550 व 11350 या पातळ्या ओलांडल्या नाहीत. या आठवड्यात देखील 10800 व 11350 या महत्वाच्या पातळ्या असू शकतील, 11350 नंतर 11550 ही प्रतिकार पातळी ठरू शकते.   

-प्रसाद ल. भावे. (9822075888)

sharpadvisers@gmail.com

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply