Breaking News

रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जत्रांची रंगत

-समाधान पाटील, पनवेल

रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. शहरांमध्ये मनोरंजनाची अनेक साधने वर्षाच्या बाराही महिने उपलब्ध असतात. गाव-खेड्यात मात्र ठराविक काळात अशी रंगत असते आणि म्हणूनच जत्रा त्यांच्यासाठी खास ठरते.

खरीप हंगाम संपून शेतकर्‍यांचे सुगीचे दिवस सुरू झाले की वेध लागतात ते जत्रांचे. हल्ली निसर्गाचे चक्र बदलल्याने बळीराजाचे जगणे असह्य झाले आहे. यंदा तर वरुणराजा सरासरीपेक्षा जास्त बरसला, शिवाय त्याने आपला मुक्कामही वाढविल्याने शेतीचे नुकसान झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाचविण्यासाठी शेतकरीवर्गाची तारांबळ उडाली होती. अखेर मळणी, झोडणीची कामे आटोपून अन्नदाता थोडीशी विश्रांती घेत आहे. त्याच्यासह कुटुंबीयांना जत्रा दोन घटका विरंगुळा देते. ग्रामीण भागात कष्टकर्‍यांसाठी आजही जत्रेचे आकर्षण कायम आहे.

पेण-खोपोली मार्गावरील साजगावची जत्रा दोन वर्षांच्या कालावधीनंतर भरली आहे. कार्तिकी एकादशीपासून 15 दिवस चालणारी ही  जिल्ह्यातील सर्वांत मोठी जत्रा मानली जाते.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ताकई देवस्थानच्या या विठ्ठल मंदिराची ओळख धाकटी पंढरी अशी आहे. सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराज मिरचीचा व्यवसाय करीत असताना साजगाव येथील डोंगरावर येऊन पैशांची वसुली करण्यासाठी बोंब (हाक) मारीत असत. याच आख्यायिकेवरून येथील जत्रेला बोंबल्या विठोबाची जत्रा म्हणूनही ओळखले जाते. या जत्रेत राज्यभरातून असंख्य लोक येतात.

जत्रेच्या निमित्ताने मिठाई, पाळणे आणि खेळण्यांची दुकाने तर असतातच, पण सुकी मच्छी, बैल व घोंगडी बाजार तसेच कृषीविषयक अवजारे ही साजगावच्या जत्रेची खास वैशिष्ट्ये आहेत. पूर्वी या जत्रेत महाराष्ट्राची लोककला अर्थात तमाशाचा फडही रंगत असे. अमन तांबे, सुरेखा पुणेकर, काळू-बाळू आदी नामवंत कलाकार या ठिकाणी आपली कला सादर करीत असत, मात्र अलीकडच्या काळात तमाशाची जागा डान्स पार्टीने घेतली ही शोकांतिका म्हणावी लागेल. शिवाय लम्पी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी बैलबाजार भरलेला नाही, पण सुक्या मच्छीचा घमघमाट दूरवरूनच येतोय. त्याचप्रमाणे गरमागरम जिलेबी यात्रेकरूंची रसना तृप्त करीत आहे.

साजगावच्या यात्रेनंतर अलिबाग तालुक्यातील आवास येथील नागेश्वरची यात्रा, मापगावची कनकेश्वरची यात्रा, वरसोलीची विठोबाची यात्रा तसेच डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीनिमित्त चौल-भोवाळेची यात्रा सुरू होते. पुढे एकविरा देवीचा यात्रा उत्सव झाल्यानंतर अनेक गावांमध्ये ग्रामदेवतांच्या जत्रा भरतात. हा हंगाम उन्हाळ्यापर्यंत चालतो. यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते आणि स्थानिकांना रोजगारदेखील मिळतो.

जत्रेला ग्रामीण भागात वेगळे स्थान आहे. लोकांच्या मनाला आनंद देणारा हा लोकोत्सव आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. या निमित्ताने सगे-सोयरे, पै-पाहुणे, मित्रमंडळी आवर्जून एकत्र येतात. बच्चेकंपनीसाठी तर जत्रा म्हणजे पर्वणीच असते. जत्रेत काय घेऊ नि काय नाही असे त्यांना होऊन जाते. मग लहानग्यांसोबत मोठी मंडळीही लहान होत धम्माल करतात. सरतेशेवटी जत्रा संपते, पण आठवणी आणि ऊर्जा वर्षभरासाठी देऊन जाते.

शहरांमध्ये महोत्सवांची धूम

ग्रामीण भागांमध्ये जत्रांचा हंगाम सुरू झालेला असताना दुसरीकडे शहरांमध्ये सांस्कृतिक महोत्सव रंगू लागले आहेत. साधारणपणे मुलांच्या सहामाही परीक्षा संपल्या की विविध महोत्सव आयोजित केले जातात. यामधून संस्कृती आणि कलेचे जतन, संवर्धन केले जाते. विशेष म्हणजे याद्वारे स्थानिक मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध होते.महोत्सवांमध्ये करमणुकीची साधने तसेच जिभेचे चोचले पुरविण्यासाठी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्सदेखील असतात. मनोरंजन आणि पेटपूजा एकाच ठिकाणी होत असल्याने संपूर्ण कुटुंबाची पावले महोत्सवाकडे वळतात. पेणमध्ये स्वररंग आयोजित पेण फेस्टिवल नुकताच रंगला. झेंडा सामाजिक संस्था आणि कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठे येथे आगरी-कराडी कामोठ्याचा महोत्सव भरविण्यात आला आहे. तेथे 4 ते 13 नोव्हेंबर असे दहा दिवस मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि स्पर्धा होत आहेत. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने नवीन पनवेलमध्ये मल्हार महोत्सव आयोजित करण्यात येतो. सर्वांगसुंदर अशा या महोत्सवाची सार्‍यांनाच प्रतीक्षा असते, तर डिसेंबर महिन्याच्या शेवटी मुरूड जंजिरा पर्यटन महोत्सव साद घालतो. याशिवाय जिल्ह्यात अनेक छोटे-मोठे महोत्सव नागरिकांना खुणावत असतात. थंडीच्या आल्हाददायक दिवसांत हे महोत्सव वातावरण आणखी सुखद करीत आहेत.

 

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply